खारेपाटण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत विशारद पूर्ण परीक्षेमध्ये गायन या विषयामध्ये आदर्श संगीत विद्यालय, कणकवलीची विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी मिलिंद गोगटे ही प्रथम श्रेणीमध्ये विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
एप्रिल – मे २०२४ या सत्रामध्ये कुमारी स्वरांगीने शास्त्रीय संगीत गायनची विशारद पूर्ण परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपातून दिली होती. या परीक्षेसाठी तिला आदर्श संगीत विद्यालयाच्या संचालिका तथा शास्त्रीय गायिका संगीत अलंकार सौ. तेजस्विता संदिप पेंडूरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तर कु. स्वरांगी ही सध्या कणकवली कॉलेज कणकवली येथे इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे. फार कमी वयामध्ये उत्तम प्रकारे मेहनत आणि अभ्यास करून स्वरांगी ने हे यश मिळविले आहे..
आत्तापर्यंत स्वरांगी ने शास्त्रीय गायन व नाट्यगीत गायन स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्यस्तरावर अनेक वेळा उत्तम प्रकारचे यश प्राप्त केले आहे. कला उत्सव स्पर्धेमध्ये शास्त्रीय गायन या प्रकारामध्ये सलग दोन वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
शास्त्रीय संगीतातील विशारद पूर्ण या परीक्षेतील स्वरांगीच्या या यशाबद्दल संगीत विद्यालयाचे संचालक संदिप पेंडूरकर, कणकवली कॉलेजचे प्राचार्य महालिंगे, कणकवलीतील संगीत तज्ञ बाळ नाडकर्णी, गंधर्व सभेचे मनोज मेस्त्री, ज्येष्ठ सिने अभिनेते अभय खडपकर यांनी अभिनंदन केले आहे.तर स्वरांगीच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुक करण्यात येत आहे.












