अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने छेडणार लक्षवेधी धरणे आंदोलन

९ जुलै रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात छेडणार एक दिवसीय धरणे आंदोलन

ओरोस (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात एक दिवसीय धरणे आंदोलन छेडणार आहे. गेल्या काही दिवसापासून शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न आहेत. या प्रश्र्नांची सोडवणूक व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने गेल्या काही महिन्यात चार ते पाच वेळा निवेदने देवून,अधिकारी यांच्या भेटी घेवून लक्ष वेधले होते. परंतू सातत्याने पाठपुरावा करूनही प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात आला आहे.

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लगेच कार्यमुक्त करण्यात यावे व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबून संबंधित बदलीधारक शिक्षकांना सदरच्या रिक्त जागा दाखविण्यात याव्यात. समांतर आरक्षणातील समुपदेशन झालेल्या शिक्षकांना आचारसंहिता संपताच तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत. पवित्र प्रणालीने भरती करण्यात येत असलेल्या नवनियुक्त शिक्षक पद भरती बाबतचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्यात यावे. नवनियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी तातडीने मिळणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी. २००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डीसीपीएस रक्कम व सहाव्या वेतन आयोगाचे एक ते पाच हप्ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा करण्यात यावी. निमशिक्षकांची(वस्तीशाळा) नियुक्ती शासन निर्णयांच्या दिनांकापासून करण्यात यावी व फरक देण्यात यावा. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षकांचे प्रमोशन करण्यात यावे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इंधन व भाजीपाला अनुदान व धान्यदी माल वेळेत मिळावा. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुर करावा. 2006 ते 5 सप्टेंबर 2018 पूर्वीच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वेतन वाढ निश्चिती प्रस्ताव मंजूर करावेत. माध्यमिक कडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या व तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना स्थायी आदेश मिळावेत. 2019 मधील मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक मिळावा. 2005 पूर्वीच्या शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. महाराष्ट्र दर्शन व प्रवास भत्ते बिले मिळावीत. चार टक्के सादील अनुदान मिळावे, आदी २१ प्रकारच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी सांगितले आहे. तसे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!