कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी – खवळेभाटले येथील रहिवासी सौ. विनया विनोद कारेकर (३५) ही शेतातून घरी आल्यानंतर घरातील पडवीत कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेवर ओले कपडे वाळत घालत असताना त्या तारेत घरातील शॉर्ट झालेल्या वायरचा वीज प्रवाह येवून विनया कारेकर यांना जबरदस्त धक्का बसला. त्यात त्या जागीच मयत झाल्या.
ही घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वा. ते ५. वा. च्या सुमारास घडली. विनया कारेकर यांच्या घरात बाहेर कपडे वाळत घालण्यासाठी जीआय तार लोखंडी बाराला बांधण्यात आली होती. घरातून बाहेर पडवीत बल्बसाठी एक वायर सोडण्यात आली होती. ती वायर शॉर्ट झाल्याने त्या वायरमधून लोखंडी बारातून वीज प्रवाह तारेत आला आणि ओले कपडे वाळत घालत असलेल्या विनया कारेकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की त्या जागीच कोसळल्या. घटना घडली त्यावेळी त्या एकट्याच घरी होत्या. बाकी सर्व शेतात होते, मुलगा घरी आल्यानंतर हा प्रकार समजला. त्यानंतर आसपासचे लोक धावून आले आणि वीज मीटर बंद करून प्रवाह खंडित करण्यात आला. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. कणकवली पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच फोंडाघाट दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार सचिन माने, पोलिस उपनिरीक्षक शेडगे घटनास्थळी पोहोचले.
विनया कारेकर यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर मोठी आपत्ती कोसळली आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.











