चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायत मध्ये पंधरावा वित्त आयोग अंतर्गत अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार पुरविणे व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत कचराकुंडी खरेदी करणे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तरी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
नांदरूख गावातील विलास चव्हाण यांनी नांदरुख ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात अनेक छोटी-मोठी विकास कामे करण्या योग्य असताना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या नावे जास्तीत जास्त निधी सरसकट कचराकुंडी खरेदी करण्यासाठी वापरला आहे. या निधीचा विनियोग हा संबंधित खरेदीच्या निविदा प्रक्रिया अथवा मक्ता निश्चिती पूर्वी झाल्याने वादातीत आहे. या खरेदीवर ग्रामपंचायतीकडून २७ ऑक्टोबर २०२३ रोजी २ लाख ३० हजार एवढी रक्कम तथाकथित पुरवठादार यांच्या नावे जमा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या कामाची निविदा मागणीचा ठराव संबंधित तथाकथित पुरवठादाराच्या खात्यात खरेदीचे पैसे जमा केल्यानंतर म्हणजे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पार पडलेल्या मासिक सभेत घेतल्याचे नमूद आहे. प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे २८ नोव्हेंबर २०२३ च्या मासिक सभेत दाखविण्यात आले आहे. खरेदीचा मक्ता निश्चित होण्यापूर्वी नेमका मक्ता ज्या पुरवठादाराच्या नावे मंजूर होतो. त्या पुरवठादाराच्या खात्यावर खरेदीची रक्कम तब्बल एक महिना अगोदर जमा होते ही बाब संशयास्पद आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या आदर्श खरेदी व्यवहार प्रक्रियेला बाधा आणणारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग निधीचा संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सेवा पुरवठादार यांनी वैयक्तिक लाभासाठी संगनमताने गैरवापर केला असून ग्रामस्थ, जिल्हा प्रशासन यांच्या डोळ्यात धुळफेक केली असल्याचे निष्पन्न होत आहे. तरी या गंभीर बाबीची तातडीने सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
त्याचबरोबर पंधरावा वित्त आयोगांतर्गत नांदरुख ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार पुरवठा करण्याच्या नावाखाली निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच कथित पुरवठादाराच्या नावे २० हजार रुपयांचा निधी ग्रामपंचायत खात्यातून वर्ग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात अंगणवाडीतील मुलांना कोणत्याही प्रकारचा पोषण आहार उपलब्ध झालेला नाही. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकांनी त्याबाबतचे पत्र दिले आहे. पोषण आहाराच्या नावावर अंकुरणक्षम लहान मुलांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराची योग्य ती दखल घेत तातडीने दप्तर तपासणी करत गुन्हा सिद्ध झाल्यास त्वरित कारवाई करावी अशी मागणीही श्री. चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामस्थांच्या या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनीही या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.











