छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावरील कोल्हापूरी चप्पल व गुळ उत्पादनांच्या स्टॉलचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

“एक स्टेशन एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत बचत गटांचे स्टॉल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या “एक स्टेशन एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोल्हापूरी चप्पल व गुळ या दोन उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलचे उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उमेद अभियानाच्या जिल्हा समन्वयक वनिता डोंगरे, आरती पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेस हरिप्रिया एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस, धनबाद एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस व इतर पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना या स्टॉलचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत एकूण २५ हजार ९१७ स्वंयसहाय्यता समूह जिल्ह्यामध्ये स्थापन झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील अंदाजे अडीच लाख महिलांचे समावेशन आहे. तसेच आजपर्यंत एकूण १ हजार २४५ ग्रामसंघ व ६७ प्रभागसंघ स्थापन झाले आहेत. उमेद अभियानामधून अनेक महिला उद्योजक बनल्या असून जिल्ह्यामध्ये शेती उत्पादन व दुग्ध व्यवसाया बरोबरच बेकरी, कापड उद्योग, दागिने, पार्लर दुकाने या व्यवसायामधून अर्थार्जन करत आहेत.

पंतप्रधान महोदयांच्या One District One Product (ODOP) संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात गुळ उत्पादनाची निवड झाली आहे. तसेच ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतंर्गत (NRETP), हा प्रकल्प कार्यान्वयित झाला असून जिल्ह्यासाठी कोल्हापूरी चप्पल क्लस्टर या विशेष प्रकल्पास मंजूरी देण्यात आली आहे. चप्पल व गुळ या उत्पादनांना GI मानाकंन असून या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीकोनातून One Station One Product (OSOP) या उपक्रमांतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकावर कोल्हापूरी चप्पल व गुळ या दोन उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

सप्टेंबर २०२४ या महिन्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्यातील तुळशी स्वयंसहाय्यता समुह, शिरोली दुमाला, तालुका करवीर व कोल्हापुरी चप्पल क्लस्टर कंपनी या दोन स्टॉलची उभारणी करण्यात आल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!