कणकवली मतदारसंघातील जलजीवन च्या सर्व अपूर्ण कामांची होणार नव्याने एस्टीमेट

आमदार नितेश राणेंच्या मागणीनुसार मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली विशेष बैठक

कणकवली (प्रतिनिधी) : जलजीवन मिशन अंतर्गत कणकवली मतदारसंघातील समस्यांबाबत आज मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार नितेश राणे यांच्या मागणीनुसार विशेष बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये जलजीवन मिशनची कणकवली मतदार संघातील अपूर्ण राहिलेल्या कामांची रिवाईज इस्टिमेट तात्काळ करण्याच्या सूचना ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. परिपूर्ण सर्वे झालेला नसल्याने अनेक योजना अपुऱ्या व अर्धवट स्थितीत राहिल्या होत्या. या मुळे काही ठिकाणी अनेक वाड्या, वस्त्या या योजनेपासून वंचित राहत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देण्याची मागणी गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्याला अखेर यश आले आहे. तसेच कणकवली मतदारसंघातील जलजीवन योजनेच्या कामांकरता 38 कोटीची आवश्यकता होती यातील 17 कोटी रक्कम द्यायची बाकी असल्याने याबाबत देखील आमदार नितेश राणे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याबाबत गुलाबराव पाटील यांनी तात्काळ ही रक्कम देण्याचे आदेश दिले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असताना अपुऱ्या कर्मचारी वर्गाअभावी ही कामे होत नसल्याकडेही आमदार राणे यांनी लक्ष वेधले असता कार्यकारी अभियंता स्तरावरील सर्व कर्मचारी वर्गाची तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता महाजन यांच्यासह मंत्रालय स्तरावरचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!