कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र केला कलंकित
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी) : कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र कलंकित केला. आम्ही त्यावर राजकारण केले नाही. मात्र संजय राऊत सारखा नालायक बांद्रा रेल्वे स्टेशन गोरखपुर एक्सप्रेसमध्ये चेंगरा चेंगरीत नऊ जखमी झाले त्याचे राजकारण करतोय. अशा कपटी लोकांना राजकारणातून हद्दपार केले पाहिजे, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. ते प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, बांद्रा स्टेशनला दुःखद घटना घडली. सर्व प्रकाराबाबत केंद्र सरकार उपाय योजना करतील. परत अशी घटना घडू नये म्हणून मार्ग काढतील. मोदी सरकार आल्यापासून रेल्वे अपघात कमी झाले आहेत मात्र यात घाणेरडे राजकारण राऊतने सुरु केले आहे. कोणत्या गोष्टीवर राजकारण करावे याची नैतिकता राऊतला नाही. कोरोना काळात ह्याच्या मालकाने तोंड काळे केले. महाराष्ट्राची बदनामी केली. तरी आम्ही सभ्यता म्हणून शांत राहिलो. स्वतःच्या बुडाखाली किती आग लागलीय ते पाहायचं नाही आणि दुसऱ्यांवर आरोप करत सुटायचे हे हे संजय राऊतने बंद करावे. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात अपघात झाले नाही का? आमचे रेल्वेमंत्री ऑन फिल्ड आहेत. तुझ्या मालकासारखे ऑनलाईन नाहीत. आधुनिकतेच्या गप्पा मारायच्या आणि बुलेट ट्रेनच्या विषयात फोडाफोडी करण्याचा प्रकार करायचा. व्यक्तिगत दुष्मनी करण्याबाबत जर पुरस्कार द्यायचा असेल तर त्याचे उद्धव ठाकरे पहिले मानकरी ठरतील. संजय राऊत माझ्या बाजूला बसून बोलला असता तर हा विषय त्याने कधीच काढला नसता. राणे साहेबांची जेवणाच्या ताटावरून अटक करण्याचा प्रयत्न करणे, त्यांचे कुटुंब नातवंडे ज्या घरात राहतात ते घर तोडण्याचा प्रयत्न करणे, याला व्यक्तिगत दुष्मनी म्हणतात. कंगना रणावतच घर तोडणे, अर्णव गोस्वामीला अटक करणे याला दुश्मनी म्हणतात. दुष्मनीत पीएचडी केलेल्या नालायकानी आमच्या नेत्यांवर टीका करू नये, असा खणखणीत इशारासुद्धा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.