अपक्ष उमेदवार नवाज खाणी कडाडले
कणकवली (प्रतिनिधी) : माझी लढाई देशाच्या राज्याच्या एकतेसाठी आहे. मी पक्का कडवट हिंदुस्थानी आहे. विधानसभेची लढाई लढताना माझे किंवा माझ्या कार्यकर्त्यांचे बरेवाईट झाले तरी मी घाबरणार नाही. स्थानिक आमदार नितेश राणे हे समाजात फूट पाडत आहेत. मला कितीही धमक्या आल्या किंवा जरी हल्ले झाले तरी मी डगमगणार नाही. मी लढणार आणि जिंकणार असा विश्वास अपक्ष उमेदवार नवाज खणी यांनी व्यक्त केला. शालेय जीवनात शिकवलेली सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा पत्रकार परिषदेत म्हणत नवाज यांनी विरोधी उमेदवार स्थानिक आमदार नितेश राणे याना ही प्रतिज्ञा माहीत नसावी अशी टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी राष्ट्र आणि राज्याची एकता आणि सर्वधर्मसमभाव भूमिकेतून काम करत आहे. मला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माझी एकतेची भूमिका जनतेसमोर मांडली आहे. मतदारसंघातील सव्वाशे हून अधिक गावांत पोचलो असून जनतेचा मला पाठिंबा मिळत आहे. देवगड आणि वैभववाडी तालुक्यात माझी प्रचारफेरी पूर्ण झाली आहे. कणकवली तालुक्यात प्रचार सुरू केला असून मी निवडून येणार हा मला विश्वास आहे.