गोकुळात रंग खेळतोsss अन् रमतो श्रीहरीsss

फोंडाघाट अखंड हरिनाम सप्ताह ची यशस्वी सांगता

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले सात दिवस पार पडलेल्या श्री देव राधाकृष्ण मंदिर, फोंडाघाट मधील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महाआरती आणि श्रमपरिहाराची मिसळपावाच्या प्रसादाने उदंड उत्साहात संपन्न झाली. गेल्या दिवसात संततधार पर्जन्यवृष्टी, मात्र कार्यक्रम प्रसंगी ओढ दिल्याने अन् बालगोपाळ मंडळाच्या प्रचंड ऊर्जेच्या नियोजनामुळे अनेक सांस्कृतिक, अध्यात्मिक, प्रासंगिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम लीलया पार पडले आणि पुन्हा एकदा खेळीयाच्या प्रांगणात आनंद द्विगुणीत झाला.

या सोहळ्या दरम्यान प्रत्येक दिवशी पूजाअर्चा, फोंडाघाट शाखेच्या “जीवनविद्या मिशन” तर्फे उपासना यज्ञ आणि स्फूर्ती गीत गायनातून “हे जग सुखी व्हावे अन तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!” हा संदेश सर्वदूर पोहोचविला गेला. स्व. राणे गुरुजींचा हरिपाठ, त्यानंतर ज्योती राणे यांचे सुश्राव्य दिवसभर भगवतगीता वाचन लक्षणीय होते. सायंकाळी विनोद गोखले यांचे पारंपारिक भजन उद्बोधक आणि लोकप्रिय ठरले. यादरम्यान माहेरवाशीणी आणि भावीक ओटी भरण्यासाठी लगबगिने येत होते. ह. भ. प. राजा पाटकर यांचे सातही दिवस वारकरी भजन अबालवृद्धांना ऊर्जा देऊन गेले. यादरम्यान फोंडा हायस्कूलची रंगीत संगीत दिंडी ‘नामदेवाचा हट्ट’ या विषयावरील प्रेक्षणीय आणि उत्साहात संपन्न झाली. लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल आणि केंद्र शाळा नंबर एक मधील मुला-मुलींनी आपल्या भक्तीमय आवाजात गजर आणि भजन सादर करून भाविकांची आणि पालकांची शाबासकी मिळवली.

शेवटच्या दिवशी राधाकृष्ण मंदिरासह मारुती मंदिर येथे सात प्रहराचा नामस्मरण सोहळा नामस्मरणात अन् नामवंत भजन बुवांच्या ट्वेंटी-ट्वेंटी डबलबाऱ्या मध्ये उदंड उत्साहात संपन्न झाल्या. भजन प्रेमींची एकच गर्दी मिसळली होती. तर हवंशा नवश्यांची लगबग प्रेक्षणीय होती. श्रीदेवी माऊली दिंडी पथक-रेड्डी येथील मंगेश कामत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवमहिमा या विषयावरील ट्रिक्सयुक्त देखावा लक्षवेधी केला. संततधारेला न जुमानता, बालगोपाळ, भाविक दिंडीत सहभागी झाले. गुलालाची उधळण,वेगवेगळ्या प्राण्यांचे जिवंत स्टॅचू, फटाक्यांची आणि ढोल-ताशांची आतषबाजी आणि भगव्या ध्वजांचे वादळ दिंडीमध्ये घोंगावत होते. गुलाबी ड्रेसकोड आणि रंगीबेरंगी पोशाखात भाविक, अबालवृद्ध राधाकृष्णाच्या गजरात बेधुंद झाले.

पहाटे भाविकांचे नवस बोलणे आणि फेडणे झाल्यानंतर खेळीयाची पालखी मंदिर प्रदक्षिणा करून काकडा, घट आणि कृष्णाच्या जयजयकारात निघाली. पहाटे दुतर्फा औक्षण आणि पायांवर पाणी घालण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. उगवाई तीरी आरती, सांगणे (गाऱ्हाणे) केल्यानंतर काकडा घट विसर्जित करण्यात आला. आणि पुढील अखंड हरिनाम सप्ताह च्या ओढीने प्रत्येकाची पावले घराकडे परतली.

error: Content is protected !!