हिंदू – मुस्लिम दंगल भडकवण्यामध्ये कोणाचे प्लॅनिंग चाललेले आहे याचा शोध घ्या
२००४ मध्ये मातोश्रीवर जी बैठक झालेली त्याचे संदर्भ तपासा,मी पुरावे देतो..!
राऊत यांच्या मुळे ठाकरेंची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर बसण्याची
उद्धवजींनी बाळासाहेबांचा असलेला रुबाब घालविला
कणकवली (प्रतिनिधी ) : महाराष्ट्रात हिंदू – मुस्लिम दंगल भडकवण्यामध्ये नेमके कोणाचे प्लॅनिंग चाललेले आहे याचा शोध घ्या. पुढचे वर्ष हे संपूर्ण निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे राज्यात अशांतता निर्माण करायची हिंदू मुस्लिम दंगल भडकवायच्या असा प्रयत्न तर चाललेला नाही ना ? याची चौकशी करा. १३ ऑगस्ट २००४ मध्ये मातोश्रीवर जी बैठक झालेली होती. ही बैठक उद्धवजींनी स्वतः बोलवलेली होती. बैठकीत दक्षिण मुंबई आणि चरणी रोड मधील मुसलमान फेरीवाल्यांवर हल्ले करा, त्यानंतर दंगल भडकवण्याची जबाबदारी आपली असे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले होते. त्या बैठकीचे आणि आता होणाऱ्या दंगलींचे संबंध आहेत काय ? याची सखोल चौकशी व्हावी. प्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. दरम्यान मातोश्रीवर झालेल्या त्या बैठकीला तथकालीन एक माजी सरचिटणीस व विद्यमान खासदार यांना पुरावा म्हणून ऑन रेकॉर्ड मी आणू शकतो असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे हे पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली.खा. संजय राऊत यांच्यासारख्या लोकांच्या नादी लागल्याने तुमची अवस्था काय झाली बघा. सोफ्यावरून तुम्ही स्टूलवर याल अशी आम्हाला भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंजवळ नेता उरला नाही कामगार न्यावा लागतो. ही उरलेल्या उद्धव सेनेची अवस्था आहे,अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीवर आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या वागणुकीवर नितेश राणे यांनी भाष्य केलंय. तसंच खासदार संजय राऊत महाविकास आघाडीतील शकुनीमामा असल्याचंही नितेश राणे म्हणालेत. काल सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची सभा झाली. त्याचे फोटो व्हायरल झालेत. बाळासाहेब ठाकरेंचा एक वेगळा रुबाब होता. मोठ्यातला मोठा नेता, कलाकार, मातोश्रीवर यायचा. बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करायचा आणि मगच मुंबईत यायचा. पण काल उद्धव ठाकरेंना सिल्हर ओकवर जी वागणूक मिळाली त्यावर त्यांनी विचार करावा. भाजपा सोबत असताना उद्धव ठाकरेंना जो मान होता. तो काल दिसला नाही, असं नितेश राणे म्हणाले आहेत. कर्नाटकात विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा असल्याचंही संजय राऊत म्हणाले होते. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. तसंच, नाना पटोलेंनाही प्रश्न विचारला आहे. नितेश राणे म्हणाले की, “मी पहि आल्या दिवसापासून बोलतोय, हा महाविकास आघाडीमध्ये शकुनीमामा, नारदमुणींचा किरदार करतोय. पूर्ण दिवस काड्या लावायच्या. महाविकास आघाडीत भाडणं लावायचे आणि अहंकार कसा दुखवायचा हा एककलमी कार्यक्रम या संजय राजाराम राऊतचा दिसतोय.देशभरात काँग्रेसबद्दल बोललं जातं. पण हा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बाजूला बसून हा काँग्रेसचा विजय नाही, विरोधकांचा विजय आहे, असल्याचं बोलतोय. हा अपमान नाना पटोलेंना मान्य आहे का, याचं उत्तर द्यावं, असंही नितेश राणे पुढे म्हणाले.