प्रथमच दोन्ही कर्तव्यनिष्ठा पुरस्कार महिलांना
आचरा (प्रतिनिधी) : गेली 11 – वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती तसेच विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने आपले सन 2023 साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव तसेच त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठा गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि रुपये ₹. 3000/= असे आहे. त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठा गौरव पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि रुपये ₹. 5000/= असे आहे.
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 05 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, प्रथमच एकाच वर्षी दोन्ही कर्तव्यनिष्ठा पुरस्कार महिलांना देण्यात येत आहेत. त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठा गौरव पुरस्कार रत्नागिरीतील खालची आळी मित्र मंडळ या संस्थेला मिळाला आहे.
पुरस्कार्थींचा थोडक्यात परिचय –
● रत्नागिरी येथे सुमारे 25 – वर्षे बॅडमिंटन क्षेत्रात पुरस्कार जिंकणाऱ्या, मुला- मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या आणि रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या रत्नागिरीच्या सौ. सरोज सीताराम सावंत आणि
● लांजा येथील कला – वाणिज्य – विज्ञान महाविद्यालय, लांजा येथे 27 – वर्षे सेवा देणाऱ्या वाणिज्य विभागप्रमुख, सहयोगी प्राध्यापक आणि पी.एच.डी. साठी मान्यताप्राप्त गाईड डॉ. सौ. सुवर्णा अनंतराव देऊसकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
● दशावतारी नाट्य प्रयोगात गेली 22 वर्षे स्त्री भूमिका सादर करणारे सिंधुदुर्गातील वेतोरे (तालुका वेंगुर्ला) येथील निवासी कलावंत अब्दुल कुन्जली नदाफ (नदाफ यांचे अभिनयातील गुरू बाबी कलिंगण हे होत.) नदाफ सध्या सुनील गोसावी यांच्या अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ पाट म्हापण येथे कार्यरत,
● तेली आळी रत्नागिरी येथील निवासी आणि गेली 42 – वर्षे कोणत्याही वेळी मृतदेहाच्या स्मशानभूमीत जाणाऱ्या अंतिम यात्रेचे सारथ्य करणारे शशिकांत महादेव नाचणकर,
● ग्रामपंचायत गोवळ (तालुका राजापूर ) या ग्रामीण भागात पहाटे 4 ते सायंकाळी 7 या वेळात दोन टप्प्यात ग्रामीण नळपाणी योजनेचे पाणी सोडण्यासाठी दररोज सुमारे 12 किलोमीटर पायपीट करणाऱ्या श्रीम. मनस्वी महेंद्र टेमकर आणि
● लाकडाच्या घोड्यावर गणपतीची निर्मिती करण्याची 100 वर्षांची परंपरा सांभाळणारे साखरपा येथील लक्ष्मण विश्राम पांचाळ उर्फ काका मेस्त्री यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
● त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठा गौरव पुरस्कार गेली 40 – वर्षे मार्गशीर्ष महिन्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे महाराष्ट्रातील एकमेव असलेले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले महिला झांजपथक तयार करणारे रत्नागिरीतील ” खालची आळी मित्र मंडळ ” या संस्थेला मिळाला आहे.
पुरस्कार प्राप्त 06 – व्यक्तींपैकी रत्नागिरी शहराबाहेरील 04 – सन्मानिताना त्यांचे सन्मानपत्र, शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी दिली जाणार आहे. रत्नागिरी शहरातील शशिकांत महादेव नाचणकर, खालची आळी मित्रमंडळ आणि सौ. सरोज सीताराम सावंत यांचा गौरव, 09 मार्च ते 11 मार्च या कालावधीत करण्यात येणार आहे असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.












