खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटण
या संस्थेच्या वतीने नगर वाचनालयाच्या अध्यक्ष मंगला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच संस्थेचे संचालक विजय देसाई व संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ येथील सभगृहात दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर,खारेपाटण हायस्कूल चे शिक्षक रामदास भिसे, वृषाली दर्पे, आदिती गुरव, अनंत राऊळ सर, तसेच खारेपाटण केंद्र शाळेच्या शिक्षिका आरती जेजोन, अलका मोरे, नगर वाचनालय खारेपाटण चे ग्रंथपाल महेश सकपाळ, लिपिक रिया जाधव, शिपाई बाबू लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रंथपाल महेश सकपाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेच्या एकूण ५५ विद्यार्थ्यांनी या कथाकथन स्पर्धेत सहभाग घेतला होता. इयत्ता ४ थी ते ५ वी एक गट तर इयत्ता ६ वी ते ७ वी दुसरा गट अशा दोन गटात ही कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी छान छान कथा सांगून उपस्थितांचे प्रबोधन केले.
नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी विविध उपक्रम शालेय विद्यार्थी व नागरीकांसाठी राबविले जात असून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या ज्ञानात अधिकची भर पडावी. हाच अशा स्पर्धा भरविण्यात मागचा उद्देश नगर वाचनालय खारेपाटण चा असल्याचे प्रतिपादन यावेळी संस्थेचे विश्वस्त संतोष पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी संचालक विजय देसाई यांनी देखील नगर वाचनालयाच्या कथाकथन स्पर्धेसाठी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कथाकथन स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून विजेत्या सहभागी विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन नगर वाचनालयाच्या पुढील कार्यक्रमात गौरविण्यात येणार असल्याचे ग्रंथपाल महेश सकपाळ यांनी यावेळी सांगितले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी मानले.


















