सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता सर्वगोड हे जनतेची फसवणूक करून जनतेला उल्लू बनवत आहेत. कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण, नूतनीकरण आचारसंहितेआधी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कणकवली रेल्वे स्टेशनसह जिल्ह्यातील अन्य रेल्वे स्टेशन सुशोभीकरण चे काम अपूर्ण आहे. 8 मार्च रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाइन केलेल्या 29 भूमीपूजनांपैकी काककवली आचरा मार्गावरील वरवडे येथील रस्ता रुंदीकरणा चे काम भूमिपूजन आधी महिनाभर सुरू केले.मात्र त्या कामातही वनसंज्ञेमधील वृक्षतोड केली आहे. स्टेज वन स्टेज टू ची परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आली आहे. याची तक्रार वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी नागपूर येथे केली असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. तसेच या मार्गावर रस्ता भरावासाठी वापरलेल्या नदीतील रवाळी वर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कणकवली तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.पुलांची कामे करताना सीआरझेड व एमसिझेड ची परवानगी घ्यावी लागते, जी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी घेतलेली नाही. ठेकेदारांना कामे देऊन स्वतःसाठी पैसे गोळा करण्याचे काम सर्वगोड करत आहेत. कार्यालयात अनुपस्थित राहत कार्यकारी अभियंता सर्वगोड मुंबई दौरे करत आहेत. 2, 3, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मी स्वतः कणकवली विभागीय कार्यालयात भेटीसाठी गेलो असता सर्वगोड मुंबई येथे गेल्याचे सांगण्यात आले. सर्वगोड यांच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती मागितली असता चीफ इंजिनिअर यांनी व्हाटसपवर मला मेसेज केला. माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देता लपवण्याचा प्रयत्न सर्वगोड करत आहेत. मुंबईत कार्यालयीन कामकाज सांगून सर्वगोड मंत्र्यांच्या एका पीए ला भेटतात. त्याचीही माहिती उजेडात आणणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले.
माजी आमदार उपरकर यांचा पुन्हा कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्यावर निशाणा












