ओरोस (प्रतिनिधी) : जिजामाता फाटा येथून जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या रस्त्यावर वडाचे झाड कोसळून पडल्याने हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला आहे. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत वडाच्या मुळाने पेट घेतल्याने शुक्रवारी रात्री पूर्ण रस्त्यावरच हे झाड आडवे झाले आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे.
जिजामाता चौक येथून जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी रस्ता आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले या ठिकाणी जाण्यासाठी किंवा येथून येण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्या नजिक जिल्हा कारागृह वर्ग १ येथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर गरुड सर्कल आहे. त्यांच्या नजिकं असलेल्या ब्रीज जवळ जुनाट वडाचे झाड आहे. या झाडाने पूर्ण रस्ता व्यापलेला होता. शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने येथील परिसरात आग लावली होती. या आगीने वडाच्या झाडाला पेट घेतला. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री नंतर हे झाड रस्त्यावर कोसळले आहे. रात्रीची वेळ होती म्हणून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. अन्यथा या रस्त्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. सकाळी येथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांना माघारी परतावे लागले. ओरोस फाटा येथून वाहने न्यावी लागली. एस टी फेऱ्याही येथून बंद झाल्या होत्या. दरम्यान, सकाळी ८ वाजले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक येथे पोहोचले नव्हते.