कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेशी राणे कुटुंबांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.
प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जात जनतेशी राणे साहेब संवाद साधत आहेत. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे.या मतदारसंघातून 90 टक्के मतदान कमळ निशाणीला होईल असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाची निर्धार प्रचार सभा लोकसभेचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी जि प सदस्य संजय देसाई, पंढरी वायंगणकर, प्रकाश पारकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, उपतालुकाध्यक्ष पूजा जाधव, माजी पं स सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,ओटव सरपंच रुहिता तांबे, कासार्डे सरपंच निशा नकाशे, दारूम सरपंच तेजस्वी लिंगायत, तोंडवली – बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशी सरपंच आचरेकर आदी उपस्थित होते. विकासाला प्राधान्य देत मी काम करत आहे. विकासनिधी देताना आम्ही कमी पडत नाही मग मते मागतानाही हक्काने मागणार. विकासनिधी देताना मी भाजपला झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ए बी सी कॅटेगरी ठरवणार. त्यानुसार विकासनिधी देणार. त्यामुळे सरपंचांनी आता ठरवावे की आपणास किती विकासनिधी हवा आहे. नांदगाव ग्रा पं निवडणूक वेळीही माझ्यावर टीका झाली. पण 11 पैकी 9 सदस्य आणि सरपंच सुद्धा भाजपाचा जनतेने निवडून दिला. नांदगाव हायवे प्रश्न, स्थानिक जनतेला रात्री अपरात्री अडचण आली तर कोण सोबत उभं राहतो हे जनतेला माहिती आहे. नितेश राणेंच्या नावाने मागील 10 वर्षांत आपण विकासाचा ट्रेलर पाहिला. जेव्हा राणेसाहेब खासदार बनतील तेव्हा सगळे प्रश्न चुटकीसरशी संपतील. केवळ खासदार नाही तर पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री नारायण राणेसाहेब असणार आहेत.विरोधकांनी कितीही टीका केली तरी जनता आणि राणे यांच्यात दरी पडणार नाही.