ओरोस (प्रतिनिधी) : पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 14 मे पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात यावेत. अन्यथा 15 मे पासून जिल्हा परिषदेच्या समोर नियुक्ती आदेश मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवड यादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पवित्र प्रणाली मार्फत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी 615 उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने 4, 5 आणि 6 मार्च 2024 रोजी कागद पडताळणी प्रक्रिया राबवून 7 मार्च 2024 रोजी पात्र, अपात्र यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 8 मार्च 2024 रोजी समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. परंतु ही प्रक्रिया रद्द झाल्याचे आदेश अकरा मार्च 2024 रोजी पत्रांद्वारे काढण्यात आले. त्यामुळे निवड झालेले जिल्ह्यातील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान लोकसभेत च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया खोळंबली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया पार पडलेल्या कार्यक्षेत्रात ही रखडलेली शिक्षक नियुक्ती तात्काळ सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी त्या त्या जिल्ह्यात मतदान झालेल्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून ही नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे त्यामुळे ८ मे पासून नवनियुक्त उमेदवारांना फक्त समुपदेशन घेऊन नियुक्ती आदेश तातडीने निर्गमित व्हावेत, अशी आमची मागणी आहे. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता ही रखडलेली नवीन शिक्षक नियुक्त प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. 14 मे पर्यंत समुपदेशन प्रक्रिया राबवून नियुक्ती आदेश निर्गमित करावेत. तसे न झाल्यास पंधरा मे पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर या अंमलबजावणीसाठी नियुक्ती आदेश होईपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर वसंत कदम, प्रदीप चव्हाण, देवेंद्र गोलतकर, माधवी सावंत, विनोद राणे, प्रगती कदम, राजन राहुळ, लक्ष्मण गोसावी या शिक्षकाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.