कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात दोन दिवसापुर्वी झालेल्या वादळी पावसाने झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान, महामार्गावर होणारे प्राणघातक अपघात, मारहाणीच्या घटना घडूनही पोलीस कारवाईला होणारा विलंब, तालुक्यातील पाणीटंचाई, खंडीत विजपुरवठा, धरण प्रकल्प, महावितरणकडून ट्री कटींगबाबत न होणारी कार्यवाही आदीच्या अनुषंगाने शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी, तहसिलदार यांची सोमवारी २० मे रोजी सकाळी १० वा. भेट घेण्यात येणार आहे. यावेळी पोलीस, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, गटविकास अधिकारी आदी संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवावे, अशी मागणी प्रांताधिकारी व तहसिलदारांकडे करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, धरणग्रस्त शेतकरी, आपद्ग्रस्त व मविआच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.
कणकवली तालुक्यात दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसात अनेक गावामंध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून जरी पंचनामे करण्यात आलेले असले तरीही या सर्व आपदग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याची गरज आहे. दि. २४ मे पर्यंत मदत न मिळाल्यास आम्ही आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करून पावसाळ्याच्या पूर्वसंधेलाच झालेल्या या नैसर्गिक आपत्तीसाठी विशेष बाब म्हणुन मदत देण्याची आमची मागणी आहे, असेही पारकर यांनी म्हटले आहे.
कणकवली तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. शहरातील प्रलंबीत समस्यांसहीत महामार्गावर मिडलकटवर होणारे अपघात ही समस्या गंभीर बनत आहे. गेल्या महिनाभरात जानवली येथे याच मिडलकटच्याठिकाणी तीघाजणांचा मृत्यू झाला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून योग्य पर्याय काढण्याची गरज आहे. तसेच शहरातील उड्डाणपुलावरून कोसळणारे धबधबे, गटारांची दुरावस्था, बंद असलेल्या स्ट्रीटलाईट यासोबतच महावितरणचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. ग्रामिण भागात ट्री कटींग झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातील अनेक समस्या उद्भवू शकतात. याअनुषंगाने संबंधीत विभागानी काय पावले उचलली आहेत, याबाबत आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे पारकर यांनी म्हटले आहे.
तसेच कणकवली तालुक्यात धरण प्रकल्पांची कामे, जमिनी संपादीत न करता सुरू करण्यात आलेली कामे, शेतकऱ्यांना न मिळालेला मोबदला, तालुक्यातील काही गावांमध्ये उद्भवलेली पाणी टंचाई याकडेही प्रशासनाने लक्ष वेधण्यात येणार असून प्रशासनाने काय कार्यवाही केली याबाबत चर्चा करू. तसेच महावितरणकडून पावसाळापुर्व कोणती कामे पुर्ण करण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास यंत्रणा कोणत्या प्रकारे सज्ज आहे, या अनुषंगाने आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधणार आहोत. तसेच तालुक्यात गेल्या काही दिवसांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाबाबत कोणताही धाक उरलेला नाही. मारहाणीच्या घटना घडूनही कारवाई होत नाही किंवा विलंबाने होत आहे. यासाऱ्याच प्रश्नांबाबत आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासोबतच अयोग्य पद्धतीचा जाब विचारणार असल्याचे पारकर यांनी म्हटले आहे.
प्रांताधिकारी व तहसिलदार यांना भेटणाऱ्या या शिष्ठमंडळात विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख निलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत यांच्यासहीत सर्व प्रमुख पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही पारकर यांनी केले आहे.