ऍड.विलास परब यांचा अभ्यासू युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण चेक पोस्ट येथे कारमध्ये अवैध बंदूक आणि 5 काडतुसे बाळगल्याच्या गुन्ह्यातील पाचही आरोपीना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश कणकवली न्यायालयाने दिले. सर्व संशयितांच्या वतीने ऍड. विलास परब यांनी यशस्वी युक्तिवाद केला.जितेंद्र पाळेकर, गोपाळ पाळेकर, विसंजीत साळुंखे, विनोद साळुंखे संतोष पाळेकर यांना अवैध बंदूक आणि जिवंत 5 काडतुसांसह कारमधून फिरताना खारेपाटण चेकपोस्ट येथे ताब्यात घेण्यात आले होते.आरोपींवर आर्म ऍक्ट 3, 25 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. सर्व आरोपीना न्यायालयात हजर करून दोन दिवस पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्याला आक्षेप घेत ऍड. विलास परब यांनी अर्नेश कुमार खटल्याचा संदर्भ देत त्यातील सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन पोलिसांकडून झाल्याचे निदर्शनास आणले. केवळ अवैध बंदूक बाळगणे या गुन्ह्याला 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असून आरोपीना अटक करणे अनावश्यक होते. सदर गुन्हा जामीनपात्र असतानाही पोलीस कोठडी मागणी करता येणार नाही असा युक्तिवाद ऍड परब यांनी केला. ऍड. परब यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची तात्काळ मुक्तता करण्याचे आदेश दिले.