नलावडे, हर्णे यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घरात मतांसाठी पैसे द्यावे लागले

राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार ; वैभव नाईक पालकमंत्री होणार

आम्ही संघर्षातून राजकारण करतो तर नलावडे, हर्णे सत्तेसाठी निष्ठा दाखवतात

माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या नलावडेंनी घेतलेल्या गुप्त भेटीची सर्वानाच माहिती

सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचे टीकास्त्र

कणकवली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी चे 31 खासदार महाराष्ट्रात निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. आमदार वैभव नाईक हे निष्ठेचे पाईक असून संघर्षातून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. वैभव नाईक हे महाविकास आघाडी सरकार मध्ये पालकमंत्री असतील. जेथे सत्ता तेथे आपली निष्ठा दाखवणाऱ्या माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंसह बंडू हर्णे यांची निष्ठा कुठे असेल हे येत्या 4 महिन्यांत दिसेल. हिम्मत असेल तर मतदारांना पैसे वाटून मते विकत घेण्यापेक्षा सामाजिक कार्य करून निवडणुकीला सामोरे जा, मग समजेल कोण जिंकेल असे आव्हान युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांना दिले. स्वतःच्या पराभवानंतर नारायण राणेंनी जनतेला दोष दिला होता.तर माजी खासदार विनायक राऊत हे उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणार आहेत. माजी पालकमंत्री उदय सामंत याना कोण कसे भेटले होते हे जगजाहीर आहे. त्यामुळे बाडगी निष्ठा आम्हाला नलावडे हर्णे यांनी शिकवू नये. स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घरात सुद्धा कणकवली शहरात भाजपला मतांसाठी पैसे वाटप करावे लागले हे भाजपचे दुर्दैव आहे. रवींद्र फाटक यांच्या पराभवानंतर कोणाची बोटे छाटली होती ? कोण भूमिगत झाले होते ? हे सर्वांनाच माहिती आहे. गद्दारी विरोधकांच्या रक्तात असल्याची टीकाही सुशांत नाईक यांनी केली. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तेजस राणे हे उपस्थित होते. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनीही नलावडे- हर्णे यांच्यावर टीका केली. आमदार वैभव नाईक हे 4 महिन्यानंतर सिंधुदुर्ग चे पालकमंत्री असणार आहेत. सत्ते असेल तेथे निष्ठा दाखवणाऱ्या नलावडे हर्णे यांना कणकवली शहरात स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घरातसुद्धा पैसे देऊन मते विकत घ्यावी लागली यातच तुमचे अपयश आहे अशी टीका कन्हैया पारकर यांनी केली.

error: Content is protected !!