चिंदर जल जीवन मिशन अंतर्गत सर्व कामांची होणार त्रयस्थ तांत्रिक तपासणी
ग्रामीण पाणी पुरवठा सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता यांनी घेतली तात्काळ दखल
आचरा (विवेक परब) : जल जीवन मिशन चिंदर निकृष्ट कामांबाबत चिंदर तंटामुक्त अध्यक्ष संतोष गावकर यांनी चिंदर ग्रामपंचायतला संबंधित ठेकेदारांवर कारवाई करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिल्याची बातमी बुधवार 12 जून रोजी संध्याकाळी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजने प्रसिद्ध केली होती. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज च्या बातमीची तात्काळ दखल घेत 13 जून रोजी सकाळी ग्रामीण पाणी पुरवठा सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजणी यांनी स्वतः चिंदर येथे जाऊन संबंधित कामाची पाहणी करून उपसरपंच दिपक सुर्वे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ चिंदर मध्ये चालू असलेल्या जल जिवन मिशनच्या सर्व आठ कामांची त्रयस्थ तांत्रिकाद्वारे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत 15 व 16 जून रोजी परीक्षण करणार असून कामाचा दर्जा, वितरण वाहिनीची खोली तपासणार असल्याचे पत्र चिंदर ग्रामपंचायतला पाठवले आहे.












