कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांकरिता प्रभावी अध्ययन-अध्यापन व्हावे यासाठी कळसुली शिक्षण संघ, मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली व जुनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली या प्रशालेमध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट डिजिटल बोर्डचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी प्रशाला डिजिटल करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. या स्मार्ट बोर्डमुळे त्यात एक पुढचे पाऊल प्रशालेने टाकले आहे. भगीरथ प्रतिष्ठान, झाराप – कुडाळ यांचे अध्यक्ष प्रसाद देवधर आणि कळसुली शिक्षण संघ मुंबई यांच्या समन्वयाने हा डिजिटल बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला.
यावेळी इ. पाचवी ते इ. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये के.आर.दळवी (चेअरमन – शालेय समिती), एम. डी. नाईक (सल्लागार -कळसुली शिक्षण संघ, मुंबई), प्रकाश दळवी (सल्लागार – कळसुली शिक्षण संघ, मुंबई), रजनीकांत सावंत (सदस्य -शालेय समिती), शिवाजी गुरव (शाळा व्यवस्थापन समिती – अध्यक्ष), शिवप्रसाद घाडीगावकर (शाळा व्यवस्थापन समिती – सदस्य), दीपक राणे (शिक्षक-पालक संघ- सदस्य), मुरकर इत्यादी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी इ. पाचवी ते इ. आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि वह्या-पाठ्यपुस्तके देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. प्रशालेतील पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन व खाऊवाटप करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष – एस. व्ही. दळवी यांनी प्रायोजकत्व स्वीकारले. या कार्यक्रमाच्यावेळी मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रशालेमध्ये स्वागत करत प्रशालेतील विविध उपक्रमांची माहिती दिली व त्यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
उपस्थितामधून मनोगत व्यक्त करताना के. आर. दळवी यांनी दहावी-बारावीच्या शंभर टक्के निकालाबाबत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ या सर्वांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रयत्न करणार्या सर्व शिक्षकांचा गुणगौरव यावेळी गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रशालेचे शिक्षक ए.जी. सावंत यांनी मानले.