ग्रामस्थांनी मागणी केल्यापासून अवघ्या एका तासात पिण्याच्या पाण्याचे ५० बॉक्स ग्रामस्थांकडे केले सुपूर्द
चौके (अमोल गोसावी) : काळसे बागवाडीला काल रात्री पासून अचानकपणे पुराच्या पाण्याने वेढा दिल्यानंतर स्थानिक रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये विशेष करून सर्वांच्या विहीरीमध्ये पुराचे पाणी गेले असून विहीरीमधील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही.
दरम्यान आज सकाळी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी काळसे येथे येत पुरस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर हे सुद्धा पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा स्थानिक ग्रामस्थ भाऊ नार्वेकर यांनी तहसीलदार यांच्याकडे पूरग्रस्त नागरिकांना संध्याकाळ पर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. बागवाडी ग्रामस्थांची ही गरज समजताच मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी तातडीने म्हणजे ग्रामस्थांनी मागणी केल्यापासून अवघ्या एका तासात पिण्याच्या मिनरल वॉटरच्या बाटल्यांचे ५० बॉक्स काळसे सातेरी मंदिर येथे आणून बागवाडी ग्रामस्थांच्या स्वाधीन केले. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या तातडीच्या मदतीबद्दल बागवाडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.