कट्टा येथील शोकसभेत संजय नाईक मित्रपरिवार यांनी व्यक्त केली भावना
चौके (अमोल गोसावी) : पेंडूर गावचे माजी सरपंच मुख्याध्यापक, प्रगतशील शेतकरी अशी ओळख असलेले संजय नाईक सर यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. संजय नाईक यांच्या जाण्याने या सर्व क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक समाजसेवी व्यक्तिमत्व हरपले आहे त्यांचे हे समाजकार्य आपण सर्वांनी संजय नाईक मित्रपरिवाराने संजय नाईक मित्रमंडळ या नावाने पुढे सुरु ठेवले तरच ती संजय नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना कट्टा येथे आयोजित शोकसभेत उपस्थित संजय नाईक मित्रपरिवारामधून व्यक्त करण्यात आल्या.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच पेंडूर गावचे माजी सरपंच, प्रगतशील शेतकरी कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा संचालक संजय नाईक यांचे ३० जून रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार ७ जून रोजी कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय मामा माडये हॉल येथे शोकसभेचे आयोजन कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नाईक सर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मामा माडये, ऍड. रुपेश परुळेकर, व्हिक्टर डॉन्टस, अशोक सावंत, दीपक भोगटे, गणेश वाईरकर, संतोष साटविलकर, आनंद वराडकर, वासुदेव पावसकर, संजय वेतुरेकर, समीर परब, सुरेश चौकेकर, प्रकाश कानुरकर, डॉ. सोमनाथ परब, दीपा सावंत, डॉ. गोपाळ सावंत, जयेंद्रथ परब, ऍड. प्रदीप मिठबावकर, समीर चांदरकर, सुमित सावंत, ऍड. मकरंद नातू , भाऊ तळावडेकर, मंगेश माडये, सुरेश कांबळी, राजन माणगावकर, मामा बांदिवडेकर, संदीप सरमळकर, विद्याधर चिंदरकर, प्रदीप आवळेगावकर, मकरंद सावंत, अनिल चव्हाण, उमेश हिरलेकर, सतीश वाईरकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी नाथ पै सेवांगणचे दीपक भोगटे यांनी संजय नाईक हे वयाने लहान असून पण कर्तुत्वाने मोठे होते. त्यांनी समाजसेवेचे व्रत जोपासताना शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. सेवांगणच्या शिष्यवृत्ती वर्गाला त्यांनी मोफत मार्गदर्शन केले होते असे सांगितले. शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर यांनी संजय नाईक यांचा जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीत सिंहाचा वाटा होता, त्यांनी अनेक विद्यार्थी व व्यक्तींना मदत केली, मात्र त्याची कधीही प्रसिद्धी केली नाही, असे सांगितले. तर व्हिक्टर डान्टस यांनी संजय नाईक यांचा चेहरा कायम हसरा असायचा, त्यांनी आपल्या पदाचा मोठेपणा कधीच मिरवला नाही आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे नाव त्यांनी अमर केले, अशी भावना व्यक्त केली.
संजय नाईक यांनी आपली विचारधारा संपूर्ण पंचक्रोशीसाठी दिली, राजकीय क्षेत्रातही नाईक यांच्या जाण्याने न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावना संतोष साटविलकर यांनी व्यक्त केली. शिक्षक प्रकाश कानूरकर यांनी नाईक यांच्या रूपाने आपला सहकारी व भाऊ गमावला आहे, असे सांगितले. संजय नाईक यांनी पेंडूर मधील शेतकऱ्यांना नवीन दिशा दाखवली, त्यांच्या जाण्याने प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून ते गेले आहेत, असे यावेळी ऍड. रुपेश परुळेकर म्हणाले. यावेळी मामा माडये यांनी नाईक यांच्या जाण्याने भंडारी समाजाचा हिरा हरपला आहे, अशी भावना व्यक्त केली. अशोक सावंत यांनी संजय नाईक यांचे कार्य आपण सर्वांनी मिळून पुढे सुरु ठेवूया, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले.
यावेळी जयेंद्रथ परब, ऍड.प्रदीप मिठबावकर, सुरेश चौकेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संजय नाईक यांच्या जीवनावर आधारीत चित्रफित दाखविण्यात आली ती पाहताना अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. सूत्रसंचालन संजय पेंडुरकर यांनी तर आभार प्रदीप मिठबावकर यांनी मानले.