तातडीने उपाययोजनेची होतेय मागणी
चौके (अमोल गोसावी) : मालवण चौके – धामापूर – कुडाळ या मुख्य रस्त्यानजिक धामापूर ते काळसे दरम्यान ठिकठिकाणी केबल तसेच पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. या कामानंतर रस्त्याकडेला आवश्यक असलेले गटार खोदण्यात आलेले नाही त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर पाण्याचा निचरा होत नसल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यात प्रामुख्याने धामापूर कॅनरा बॅंकेनजीक श्री. रामचंद्र आजगावकर यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. रस्त्याकडेला गटार नसल्यामुळे साचलेले चिखलयुक्त पाणी रस्त्यावरून पलीकडे वाहत जाऊन आजगावकर यांच्या घर आणि दुकानाभोवताली साचून तर काही पाणी आजगावकर यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत जात असून त्यांच्या विहिरीतील पाणी दूषित होत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने कार्यवाही करून रस्त्याकडेला गटार खणून पाण्याचा योग्य दिशेने निचरा व्हावा यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी रामचंद्र आजगावकर यांनी केली आहे.