कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील अनिकेत संदिप नागवेकर, वय 22 वर्षे याचेशीही ओळख वाढवून संशयित आरोपी जीवन जाधव नामक व्यक्तीने आपण कोर्टात कामाला आहे, तुला कणकवली येथे कोर्टात नोकरीला लावतो असे सांगितले. नोकरीबाबत दिलेल्या आवश्वासनामुळे अनिकेत नागवेकर याने त्यांचेच वाडीतील सायली सतिश चाळके यांचे मालकीची होंडा युनिकॉर्न क्र. MH-08-AV-7774 घेवून संशयिताने फिरवले आणि 2 जुलै रोजी मोटरसायकल घेवून पळ काढला होता. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानुसार दि. 30 जुलै 2024 रोजी सांगली येथे गुन्हा अन्वये शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत असताना शिराळा, बायपास रोड येथे आरोपी जीवन गणपत जाधव, रा. पावस, जि. रत्नागिरी असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मध्यरात्रीची वेळ असूनही विशेष प्रयत्नाने नियोजनबध्द सापळा रचत आरोपीस गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपी व मोटार सायकल पुढील कायदेशीर कारवाईकरीता कणकवली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत. संबंधित आरोपीने अशाप्रकारे अजून कोठे गुन्हे केलेत आहेत का? याबाबत तपास सुरू आहे. या बाबत वृत्त असे की, एक जाधव आडनावाचा इसम कोड आंबेड, भंडारवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा- रत्नागिरी येथील चिंचकर चाळीमध्ये माहे जून 2024 मध्ये भाड्याने राहण्यास आला. त्याने वाडीतील लोकांशी ओळख करुन त्यांचेशी सलगी वाढवीली. त्याच वाडीत राहणारा अनिकेत संदीप नागवेकर, वय 22 वर्षे याचेशीही ओळख वाढवून आपण कोर्टात कामाला आहे, तुला कणकवली येथे नोकरीला लावतो असे सांगितले. नोकरीबाबत दिलेल्या आवश्वासनामुळे अनिकेत नागवेकर याने त्यांचेच वाडीतील सायली सतिश चाळके यांचे मालकीची होंडा युनिकॉर्न क्र. MH-08-AV-7774 घेवून जाधव नावाचा इसम आणि अनिकेत नागवेकर असे दोघेही मोटार सायकलने 29 जून 2024 रोजी दुपारनंतर संगमेश्वर वरुन कणकवलीला येणेसाठी निघाले, कणकवली येथे येणेसाठी रात्र होणार असल्याने राजापूर येथे लॉजवर मुक्काम केला. तेथून 30 जून 2024 रोजी दोघेही मोटार सायकलने कणकवली, ओरोस असा प्रवास करीत कुडाळ येथे आले. जाधव नामक व्यक्तीने अनिकेत नागवेकर याला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्गात इकडे-तिकडे फिरवीले. मुदतीत 30 जून 2024 ते 02 जुलै 2024 पर्यंत कुडाळ येथे लॉजवर थांबले. त्यानंतर दिनांक 02 जुलै 2024 रोजी जाधव याने अनिकेत यास तू रेल्वेने संगमेश्वरला जा असे सांगून कुडाळ रेल्वेस्टेशन येथे रेल्वेचे तिकीट काढून दिले. परंतू अनिकेत नागवेकर याने रेल्वेने जाणेस नकार दिला. त्यानंतर ते मोटार सायकलने संगमेश्वरला जाणेसाठी निघाले असता फोंडा येथे एका निर्जन ठिकाणी लघुशंकाच्या बहाण्याने मोटार सायकल थांबवून अनिकेत हा लघुशंकेसाठी खाली उतरला असता जाधव हा मोटार सायकल लबाडीच्या इराद्याने चोरुन घेवून पळून गेला. त्यानंतर अनिकेत नागवेकर हा एस.टी. बसने संगमेश्वर येथे गेला व त्याने संगमेश्वर पोलीस ठाणे येथे सदरबाबत तक्रार दिली. संगमेश्वर पोलीस ठाणेने सदरची तक्रार घेवून कणकवली पोलीस ठाणे येथे पाठविली. त्यावरुन कणकवली पोलीस ठाणे गु.र.नं. 210/2024, भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये दि. 10 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याचे तपासकामी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी पथक नियुक्त करुन त्यांना तपासाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन तपास पथक रवाना केलेले होते. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांचे नेतृत्वाखाली पोलीस हवालदार किरण देसाई, आशिष जामदार व जयेश सरमळकर यांचे पथकाने गुन्ह्याचे फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे चौकशी केली. चौकशीमध्ये सदर जाधव नामक आरोपीची बोली- भाषा, पेहराव, चेहरेपट्टीबाबत माहिती मिळाली. त्यावरुन रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी केली असता जीवन गणपत जाधव, रा. पावस, जि. रत्नागिरी याचेवर सिंधुदुर्गनगरी व सावंतवाडी पोलीस ठाणेमध्ये यापुर्वी 2006 व 2016 मध्ये गुन्हे दाखल असून त्याने सदरचा गुन्हा केला असावा असे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानंतर महामार्गावरील तसेच ज्या लॉजला आरोपी व फिर्यादीने वास्तव्ध केले होते त्याठिकाणचे CCTV फुटेज चेक केले असता आरोपी व फिर्यादी हे सदर मोटार सायकलने प्रवास करत असतानाचे फुटेज प्राप्त झाले. जीवन जाधव याचेवर यापुर्वी जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील रेकॉर्डवर असलेले जुने फोटो प्राप्त करुन घेतले. CCTV फुटेज व गुन्ह्यातील प्राप्त केलेले फोटो यांचे सुक्ष्म निरीक्षक करता त्यामध्ये साम्य दिसून आले व तोच महत्त्वाचा धागा पकडून मानवी कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणावरुन अविरत तपास करुन, आरोपीचा रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली येथे शोथ तपास सुरू केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस हवालदार किरण देसाई, आशिष जामदार व जयेश सरमळकर यांनी केली आहे.











