शाळेतील मुलांच्या वक्तृत्वातून विविध पैलू वर भाष्य ! उपस्थित अंतर्मुख
फोंडाघाट मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : पावसाने ओढ दिल्याने भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन फोंडाघाट पंचक्रोशीत उत्साहात संपन्न झाला. फोंडाघाट ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतच्या आयोजनातून केंद्रशाळा फोंडा नंबर १ च्या प्रांगणात सरपंच संजना आग्रे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत – ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. भारतमाता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ, एनसीसी व स्काऊट कॅडेट, प्राध्यापक – शिक्षक वर्ग, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचारी तसेच प्रशालेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात संजना आग्रे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना, शासनाच्या विविध योजनांचा पंचक्रोशीतील सर्वांनी लाभ घ्यावा. काही अडचणी असल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधून निराकरण करून घ्यावे,असे आवाहन केले. विविध प्रशालेतील मुलांनी आपल्या सहज सुंदर वक्तृत्वातून समाजातील विविध समस्या – पैलूवर स्पष्ट भाष्य करत, उपस्थिताना अंतर्मुख केले. कुमारी निर्झरा हुंबे हीचे भाषण लक्षवेधी ठरले. स्वातंत्र्याचा उत्साह सर्वत्र दिसत असताना गेल्या तीन दिवसातील “हर घर तिरंगा” आवाहनाला फोंडाघाट मध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
फोंडाघाट एस.टी. स्टँड येथे कंट्रोलर पवार यांचे हस्ते मान्यवरांचे उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी माळवाडी शाळेतील विद्यार्थिनी रिदिक्षा सोनुर्लेकर, जानवी चव्हाण यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाविषयी च्या भावना वक्तृत्वातून व्यक्त केला.त्याला मान्यवरांनी दाद दिली.
संजीवनी हेल्पलाइन तर्फे सुरेश टक्के, भाई गुरव यांनी बाजारपेठेमध्ये सर्वांना जिलेबी वाटप केले. फोंडाघाट ग्रामपंचायत, गावातील वाडी – वाडी वरील शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन आनंदात उत्साहात संपन्न झाले. बाजारपेठ-मंदिरामधून स्वातंत्रपर गीतांनी वातावरण उत्साही होते.












