राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आमदार नितेश राणेंकडून अवमान

समाज कल्याण बेंच ठेक्यात दीड कोटींचा भ्रष्टाचार ; शिवसेनेचे आत्मक्लेश आंदोलन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेतून समाजनकल्याण विभागाच्या वतीने अडीच कोटींचे बेंच दिले. हे बेंच ग्रामपंचायतना वितरित करण्याआधी ठेकेदाराला अदा करण्यात आले. या बेंच कामात दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजना मधून हे बेंच दिले असतानाही त्या बेंचवर राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून असे लिहिले आहे. हा राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असून याविरोधात 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके उपस्थित होते. हे बेंच आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार ठेकेदाराकडून घेण्यात आले. समाज कल्याण अधिकारी आणि आमदार नितेश राणे यांनी संगनमताने हा भ्रष्टाचार केला असून आ. नितेश राणे धार्जिण्या ग्रामपंचायत च्या लोकप्रतिनिधींकडून हे बेंच ग्रामपंचायतला पोच होण्याआधीच बेंच मिळाल्याचे पत्र देण्यात आल्याचा आरोपही सावंत यांनी केला. ज्याप्रमाणे राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा उभारून तो पडला त्याचप्रमाणे हे बेंच पावडर कोटिंग न करता वाटप करण्यात आले आहेत. एकूण 2 हजार बेंच 250 ठिकाणी वितरित करण्यात आले आहेत. या बेंचवर राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजना ऐवजी आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून असे पेंटिंग करण्यात आले आहे हे निंदनीय आहे. भाजपाचा हा अजेंडा आहे की त्यांना संविधान नको आहे त्यांना केवळ मागासवर्गीयांची मते हवी आहेत. हे सर्व बेंचेस मागासवर्गीय वस्तीत बसवावे असा स्पष्ट उल्लेख जी आर मध्ये असतानाही हे बेंच अन्य ठिकाणी बसविण्यात आले आहेत. एक वेळ मागासवर्गीय ग्रामस्थ समजुतीने ही बाब घेतील परंतु त्या बेंचवर डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजना ऐवजी आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने असा केलेला उल्लेख मागासवर्गीय जनता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनावर कलर लावून आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून असा उल्लेख करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सतीश सावंत यांनी केली. राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला हा अपमान आम्ही सहन करणार नसून 30 सप्टेंबर रोजी आत्मक्लेश आंदोलन कणकवली विधानसभा शिवसेनेच्या वतीने करणार आहे. या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर प्रेमी संघटनांनी सामील व्हावे असे आवाहन ही सावंत यांनी केले. मागासवर्गीय वस्तीमधून या बेंचेस ची मागणी करण्यात आली नव्हती तरीही हे बेंच देण्यात आले आहेत. पायवाट, रस्ता आदी मूलभूत गरजा असतानाही भ्रष्टाचार करण्यासाठी हा बेंचेसचा ठेका आमदार नितेश राणेंच्या शिफारशी ने देण्यात आल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला.हे सर्व बेंचेस पावडर कोटिंग शिवाय आहेत मात्र जीआर मध्ये पावडर कोटिंग असणे अत्यावश्यक असा उल्लेख आहे.त्यामुळे हे बेंचेस लवकरच गंजून जातील असेही सावंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!