सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : दोडामार्ग घोटगे येथे केळ बागायती मधील सहकारी शेत मजूर रवींद्र केलण याचा कोयत्याने डोक्यावर चेहऱ्यावर हाता पायावर वार करून निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यातील सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मणीकंदन रामकृष्णन ( मूळ रा केरळ ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश देशमुख यांनी फेटाळला. खुनाची घटना 10 मार्च 2022 रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली होती. फिर्यादी मनोज गानमनी यांच्या फिर्यादीनुसार 11 मार्च 2022 रोजी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी मणीकंदन याने दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपी आणि साक्षीदार एकाच गावातील असून जामिनावर मुक्त झाल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपी केरळ राज्यातील असून जामिनावर मुक्त झाल्यास तो न्यायालयीन सुनावणीस हजर राहण्याची शक्यता कमी आहे.खुनाच्यागंभीर गुन्ह्यात आरोपीचा प्रत्यक्ष आणि मुख्य सहभाग आहे. आरोपी पुन्हा असा गुन्हा करू शकतो. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश देशमुख यांनी आरोपी रामकृष्णन याचा जामीन अर्ज नामंजूर केला.