खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने कुरंगवणे गावातील महत्त्वाची विकास कामे होण्याबाबत लेखी निवेदन माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान भजपा खासदार नारायण राणे यांच्याकडे मुंबई येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आले. यावेळी कुरंगवणे येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मांजरेकर, विष्णू कदम उपस्थित होते. या दिलेल्या निवेदनात एकूण ७ विविध कामांबाबत मागणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुंबई गोवा हायवे (नडगिवे) ते कुरंगवणे मांजरेकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, कुरंगवणे पाटणबाव ते खारेपाटण रोड (चिंचवली) रेल्वे स्थानक प्रस्तावित नवीन रस्ता तयार करणे, कुरंगवणे देवीचा झरा ते खैराटवाडी मार्गे शिडवणे रस्ता डांबरीकरण करणे, कुरंगवणे सनगरवाडी ते पूर्व प्राथमिक जिल्हा परिषद शाळा पश्चिम कुरंगवणे (पवारवाडी) रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे, नडगिवे खिंड (घोवमारी) ते मांजरेकरवाडी रस्ता खडीकरण / डांबरीकरण करणे, पश्चिम कुरंगवणे ते स्मशानभुमी रस्ता नुतनीकरण करणे, कुरंगवणे मांजरेकरवाडी स्मशानभुमी नवीन रस्ता करणे अशा कामांबाबत चे लेखी निवेदन खासदार नारायण राणे यांचेकडे नुकतेच देण्यात आले. सदरचे निवेदन मिळणेसाठी गावचे सरपंच श्री.पपू ब्रम्हदंडे आणि उपसरपंच श्री बबलू पवार यांनी सहकार्य केले. तसेच नारायण राणे यांची भेट मिळण्यासाठी सूर्यकांत भालेकर यांनी मदत केली.