विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी

जिल्ह्यात ०६ लाख ७२ हजार ०५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ३ विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी पाटील म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार,२९ ऑक्टोबर, २०२४ असा आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी बुधवार, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२४ रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२४ आहे. या निवडणूकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होईल तर शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ मतमोजणी होईल. तर सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४ रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ३ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत कणकवली विधानसभा मतदारसंघात १ लाख १३ हजार ४८२ पुरुष, १ लाख १६ हजार ०६१ महिला, १ तृतीयपंथी असे २ लाख २९ हजार ५४४ मतदारांची संख्या आहे. कुडाळ विधासभा मतदारसंघात १ लाख ७ हजार २०१ पुरुष, १ लाख ८ हजार २८२ महिला, असे २ लाख १५ हजार ४८३ मतदारांची संख्या आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ लाख १३ हजार ५६० पुरुष, १ लाख १३ हजार ४६६ महिला, असे २ लाख २७ हजार ०२६ मतदार असे एकूण ६ लाख ७२ हजार ०५३ मतदार आहेत.

८५ वर्षावरील वयोगटातील मतदारांची संख्या ११ हजार ३६४ इतकी असून जिल्ह्यात ०७ हजार ९०० इतके मतदार हे दिव्यांग आहेत. मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्र (कणकवली ३३२, कुडाळ २७९ व सावंतवाडी ३१०) असून आयोगाच्या सूचनानुसार ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सेक्टर अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध आहे. व्होटर हेल्प लाईनद्वारे मतदारांना मतदानाचे दिवशी ऑनलाईन पध्दतीने आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा. सी -व्हिजल ॲपद्वारे नागरीक आचारसंहिता भंगाची तक्रार करु शकतात. तर केवायसी ॲपद्वारे नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे. तर राजकीय पक्ष व उमेदवारांना विविध परवानगीसाठी सुविधा अॅप द्वारे उमेदवार विविध परवानगी मागू शकतात. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने नुकतीच १०० विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आचार संहितेबाबत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने निर्देश दिले, निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून तसे आदेश पारित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!