शासकीय कामात अडथळा आणत तलाठयाला मारहाण करणाऱ्या आरोपी नितीन नाईक चा अटकपूर्व जामीन नामंजूर

आरोपी नितीन नाईकवर अटकेची टांगती तलवार

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी, सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : कर्ली नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा वर कारवाई करताना शासकीय कामात अडथळा आणून शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल असलेला आरोपी नितीन शिवाजी नाईक ( रा.सरंबळ, ता.कुडाळ ) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळला.याकामी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी, सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 30 मे 2023 रोजी दुपारी 3 वा.50 मिनिटांनी तलाठी पदी कार्यरत असलेले फिर्यादी किरण सुधाकर सोनावणे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह कर्ली नदीकिनारी सरंबळ भाटीवाडी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई करत असताना बोटमालक नितीन नाईक यांनी तलाठी सोनावणे यांना शिवीगाळ करत मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली होती. याबाबत तलाठी किरण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुडाळ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला हरकत घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी, सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कर्ली खाडीत वाळू उत्खन करण्यास हायकोर्टाची बंदी असतानाही आरोपी नाईक ने वाळू उत्खनन केलेलं आहे, हा एकप्रकारे हायकोर्टाचा अवमान आहे.फिर्यादी किरण सोनावणे हे कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता आरोपीची पत्नीने 35 वाळू व्यवसायिकांसह फिर्यादीला फिर्याद न देण्यासाठी दबाव आणल्याचे कुडाळ पोलीस ठाणे डायरीमध्ये क्रमांक 04 / 2023 नुसार नोंद आहे.आरोपी नितीन नाईक हा हिस्ट्री सीटर असून यापूर्वीही त्याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात वाळूचोरी तसेच कुडाळ एक्साईज ऑफिस मध्ये दारुचोरी चे गुन्हे दाखल आहेत. फिर्यादीला आरोपी नितीन नाईक याने गुन्हा दाखल केल्यास 6 दिवसांत बाहेर येऊन तुला संपवून टाकेन अशी धमकी दिलेली आहे.फिर्यादी कडील जप्तीयादी व पंचयादी आरोपी नाईक ने फाडून टाकली आहे.गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे यासह अन्य मुद्दे सरकारी वकील देसाई यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी, सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी आरोपी नितीन नाईक चा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.त्यामुळे आरोपी नितीन नाईक वर अटकेची टांगती तलवार आहे.

error: Content is protected !!