उन्हाळी सुट्टी हंगामात देवगड आगाराला १ कोटी ७४ लाखाचे उत्पन्न

देवगड (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात देवगड आगाराने मे महिन्यात रु १ कोटी ७४ लाख एवढे उत्पन्न प्राप्त केले असून यात उन्हाळी हंगामात १० एप्रिल ते १० जून या काळात बोरिवली, कुर्लानेहरुनगर, नालासोपारा, बेळगाव या मार्गावर जादा प्रवासी या प्रवासी फेऱ्यांमधून देवगड आगाराला रु ४८ लाख ४७ हजार २२५ एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

देवगड आगारातून उन्हाळी हंगामात नियमित ग्रामीण फेऱ्या त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या पणजी, रत्नागिरी, पुणे, बेळगाव, तुळजापूर, सांगली, अक्कलकोट या प्रवासी फेऱ्यांबरोबर मुंबई मार्गावर बोरिवली, कुर्ला नेहरू नगर, नालासोपारा, आणि बेळगाव या मार्गावर जादा प्रवासी वाहतूक सोय करण्यात आली होती. चालू वर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी ७५ वरील नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत या सवलती चा फायदा प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणात झाला व त्यामुळे चालू वर्षीच्या उन्हाळी हंगामात एसटीच्या उत्पन्नात तसेच प्रवासी भारमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. देवगड आगाराच्यावतीने उन्हाळी सुट्टीच्या हंगामा करता मुंबई मार्गावर १० एप्रिल ते १० जून या कालावधीत बोरिवली, कुर्लानेहरूनगर नालासोपारा या जादा प्रवासी फेऱ्यांबरोबर नियमित देवगड बोरीवली शयनासनी प्रवासी फेरी सुरू ठेवण्यात आली होती. ज्यादा प्रवासी फेऱ्यांमधून देवगड आगारातून एकूण १लाख ५३ हजार ९६४ किमी एवढा प्रवासातून एकूण १९ हजार ८०० प्रवाशांनी प्रवास केला व या जादा फेऱ्यांच्या माध्यमातून देवगड आगाराला रु ४८ लाख ४७ हजार २२५ एवढे उत्पन्न प्राप्त झाले. देवगड बेळगाव मार्गावर एकूण आठ दिवस जादा प्रवासी फेरी सोडण्यात आली होती. या व्यतिरिक्त नियमित आगारातून सुटणाऱ्या प्रवासी फेऱ्या या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. आणि या सर्व उत्पन्नात प्रामुख्याने मे महिन्याच्या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीत यावर्षी देवगड आगाराने जादा प्रवासी फेऱ्यांसह अन्य ग्रामीण व नियमित फेऱ्यामधून में महिन्यात १ कोटी ७४ लाख एवढे उत्पन्न प्राप्त केले. विशेषतः देवगड आगारात उपलब्ध असलेल्या जुन्या प्रवासी वाहनांमधून देवगड आगाराने सुरक्षित वाहतूक करून हे उत्पन्न प्राप्त केले. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक निलेश लाड, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहाय्यक वाहतूक निरीक्षक लव सरवदे, सर्व वहातुक नियंत्रक, कार्यशाळा अधीक्षक तसेच कार्यशाळा कर्मचारी, वाहन परीक्षक व चालक वाहक या सर्वांच्या सहकार्याने यावर्षीची उन्हाळी वाहतूक सुरक्षितपणे पार पडली.

error: Content is protected !!