आगारातून उशिरा सुटणाऱ्या बसफेऱ्या आणि आवश्यकतेवेळी बंद पास काउंटर याबाबत विचारला जाब
कुडाळ (अमोल गोसावी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आज कुडाळ एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराबाबत अधिकारी वर्गाला जाब विचारण्यात आला. एसटी आगारातून उशिरा सुटणाऱ्या गाड्या, डॉन बॉस्को स्कूल फेरीचा अनियमितपणा, आवश्यक त्या वेळी बंद असलेले पास काउंटर याबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले.
मागील दोन दिवस कुडाळ ओरोस डॉन बॉस्को जाणारी फेरी उशिरा निघत असल्याने विद्यार्थी डॉन बॉस्को स्कूल फेरीबाबत एसटी अधिकाऱ्यांना विचारणा करून खडेबोल सुनावले. एसटी आगाराच्या उशिरा सुटणाऱ्या फेऱ्यामुळे विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन अभ्यासावर सुद्धा ताण पडत असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी एसटी प्रशासनाला सांगितले याबाबत आगार व्यवस्थापक पाटील यांच्याशी चर्चा करून पास काउंटर तसेच डॉन बॉस्को स्कूल फेरी बाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन एसटी अधिकाऱ्यांनी दिले.













