के सी सी मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर नगर संघ विजेता तर पंचशील खारेपाटण संघ उपविजेता

विजेता संघाला १ बोकड तर उपविजेता संघाला ११ कोंबडे बक्षीस रुपात प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील के सी सी मित्र मंडळ कोष्टेवाडी,खारेपाटण यांच्या वतीने नुकतेच केदारेश्वर मैदान खारेपाटण येथे दोन दिवसीय भरविण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म अर्थात खारेपाटण प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर नगर खारेपाटण हा संघ अंतिम विजेता ठरला. तर पंचशील नगर खारेपाटण हा संघ उपविजेता ठरला.

या क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोकरे, भाऊ राणे व संदेश धुमाळे,संकेत शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले होते.फक्त खारेपाटण गाव वाडी मर्यादित असलेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. तर या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, रुपेश सावंत, निखिल गुरव, संतोष पाटणकर, दिगंबर राऊत, अनंत गुरव, किरण कर्ले, प्रशांत धुमाळे, के सी सी मित्र मंडळाचे अध्यक्ष उत्तम रोडी, रामेश्वर नगर संघाचे कोच महादेव मोटे सर, मंडळाचे कार्यकर्ते सचिन निग्रे, संकेत लोकरे, किशोर निग्रे, संतोष लोकरे, प्रणय गुरसाळे, सुशांत रोडी, सूरज कांबळी, जयेश लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे के सी सी मित्र मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

के सी सी मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच खारेपाटण मध्ये एका आगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम विजेता रामेश्वर नगर खारेपाटण या संघाला एक बोकड व प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक निखिल गुरव व प्रशांत धुमाळे यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. तर या स्पर्धेतील उपविजेता ठरलेल्या पंचशील नगर खारेपाटण या संघाला ११ गावठी कोंबडे व द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक विजय देसाई व उत्तम रोडी यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.

तसेच या क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पंचशील नगर खारेपाटण चा खेळाडू विराज पाटणकर याला एक अंडी ट्रे व आकर्षक चषक तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून पंचशील नगर खारेपाटण संघाचा खेळाडू देवेंद्र कदम याला एक ट्रे अंडी व आकर्षक चषक तसेच स्पर्धेचा मालिकावीर म्हणून रामेश्वर नगर खारेपाटण संघाचा खेळाडू आराध्य तेली याला एक ट्रे अंडी व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई व संतोष पाटणकर यांनी के सी सी मित्र मंडळाचे कौतुक करून स्थानिक मुलांना पुढे आणण्यासाठी व स्थानिक खेळाडूंच्या उपजत गुणांना संधी देण्याचे काम केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले. तर अशा स्पर्धातून देशासाठी चांगले खेळाडू निर्माण होतील. अशी आशा देखील त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मंडळाचे कार्यकर्ते संतोष लोकरे यांनी मानले.

error: Content is protected !!