रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरे येथे अक्षरोत्सव २०२४ साजरा होणार

कै.श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली.

आचरा (प्रतिनिधी) : शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरे येथे 8 मे 2024 रोजी अक्षरोत्सव 2024 हा वांङमयीन कार्यक्रम होणार आहे. आचरे गावचे सांस्कृतिक भूषण तथा वाचनालयाचे 16 वर्षे उपाध्यक्ष स्थान तथा 17 वर्षे अध्यक्ष स्थान भूषविलेले कै. श्रीकांत रघुनाथ सांबारी यांचा प्रथम स्मृतीदिन 8 मे 2024 ला येत आहे. त्यानिमित्त या अक्षरोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून सदर अक्षर सोहळा दुपारी 3.30 ते 5.30 या वेळेत संपन्न होणार आहे. प्रतिवर्षी याच पुण्यदिनी वाचन आणि लेखन संस्कृतीच्या जपणूकीसाठी ‘अक्षर महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष बाबाजी गोपाळ भिसळे यांनी दिली. तर कार्यक्रमाची रूपरेषा विषद करताना अर्जुन दत्तात्रय बापर्डेकर (कार्यवाह) म्हणाले, “अक्षरपूजन, अक्षरदान, अक्षरगौरव असे विविध वांङमयीन उपक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी मातृभाषा संवर्धन आणि जपणुकीसाठी लेखन, वाचन, भाषण आणि संभाषण या भाषिक कौशल्यांच्या विविध उपक्रमांचे आम्ही आयोजन करणार आहोत.” यावर्षी सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष – कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांचा ‘आनंद अक्षरांचा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार असून त्याच वेळी विविध क्षेत्रातील सोळा मान्यवरांच्या हस्ते वाचनालयासाठी ‘अक्षरदान’ होणार आहे.

आज रामेश्वर वाचन मंदिर मध्ये कार्यकारिणी, सांस्कृतिक समिती यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक कार्यक्रम संयोजक सुरेश ठाकूर यांचे समवेत अशोक कांबळी (उपाध्यक्ष), जयप्रकाश परुळेकर, वैशाली सांबारी, उर्मिला सांबारी, भिकाजी कदम, दिपाली कावले आदी कार्यकारिणी सदस्य, श्रीम. विनिता कांबळी (ग्रंथपाल), स्वप्नील चव्हाण आदी कर्मचारी तसेच कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, विलास आचरेकर हे सांस्कृतिक समिती सदस्य उपस्थित होते. मंदार श्रीकांत सांबारी (सांबारी कुटुंब प्रमुख) यांनी ‘अक्षर महोत्सव 2024’ च्या आयोजनाबद्दल रामेश्वर वाचन मंदिराच्या कार्यकारिणीचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!