कुडाळ पोलीस स्टेशन द्वारे संविता आश्रमात दाखल झाला होता दुर्गादास
खारेपाटण (प्रतिनिधी) : आंध्रप्रदेशातील दुर्गादास कोल्ली (वयः३९) या बौध्दीक दृष्ट्या अक्षम (स्लो लर्नर) युवकाचे संविता आश्रमकडून नुकतेच कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले. हैदराबाद येथून कुटुंबियांची नजर चुकवून दुर्गादास हा युवक कोणत्या तरी रेल्वेगाडीत बसून थेट कुडाळ येथे पोहचला होता.कुडाळ पेट्रोल पंप येथे निराधार स्थीतीत आढळून आलेल्या या अनोळखी युवकास पणदूरच्या संविता आश्रमात दोन महिन्यांपूर्वी २७ फेब्रुवारी,२०२४ रोजी देखभालीसाठी दाखल करण्यात आले होते.
आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील राजमुंडरी जवळील निडाडावोलू हे छोटेशे शहरा दुर्गादासचे मुळगाव आहे.एका गरीब कुटुंबातील हा युवक जेव्हा सापडला तेव्हा नातेवाईक वा त्याच्या ठावठिकाण्याविषयी तो काही सांगू शकत नव्हता. जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांचेशी पोलीस अधिकारींचा संवाद होवून त्यास कुडाळ पोलीस स्टेशनद्वारे संविता आश्रमात दाखल करण्यात आले.
तेलगू भाषेशिवाय अन्य भाषा बोलू न शकणा-या आणि मुळातच बोलताना बोबडे बोलणा-या दुर्गादासच्या कुटुंब आणि नातलगांचा शोध घेणे हे मोठे दिव्य होते. मात्र जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे व संविता आश्रमच्या टिमने गुगल आधारे तसेच संस्थामधील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधीं यांच्याशी संवाद साधून तसेच इतर मार्गांनी निडाडावोलू या शहरातील दुर्गादासच्या कुटुंबाचा शोध घेण्याचे अविरत प्रयत्न सुरू ठेवले. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले. आणि निडाडावोलू पोलीस स्टेशनद्वारे त्याच्या कुटुंबियांशी संपर्क होवून संवाद सुरू झाला.
अखेर रविवर दि.२८ एप्रिल २०२४ रोजी संविता आश्रमात दाखल झालेले दुर्गादासचे वडिल रामण्णा कोल्ली व मित्र बशीर यांच्या ताब्यात त्यास देण्यात आले. संविता आश्रमचे व्यवस्थापक देवू सावंत, सोशल वर्कर माधव पाटिल हे यावेळी उपस्थीत होते. संविता आश्रमातील स्टाफ कार्यकर्त्या सुवर्णा कोकरे, सोनाली साटम व मिनाक्षी पाटिल यांनी दुर्गादासचे औक्षण करून त्यास पुढिल आनंददायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. जीवन आनंद संस्थेच्या आश्रम आणि शेल्टरहोमद्वारे आजतागायत देशभरातील विविध राज्यांतील ४५० हून अधिक निराधार बांधवांचे कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले आहे.















