सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शंभू छत्र मल्ल (वय 35, सध्या रा. मालवण, मूळ रा.नेपाळ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी याकामी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी शंभू मल्ल हा चायनीज कुक असून मालवण मधील एका हॉटेलमध्ये जानेवारी 2024 पासून कामाला होता .पीडित मुलगी ही मुंबई येथे राहणारी असून आरोपी च्या मित्राची बहीण असून आरोपीने तिला मुंबईहून आधी वेंगुर्ले, कुडाळ आणि नंतर मालवण येथे आणले होते. हॉटेल मालकाकडे पीडित मुलगी ही आपल्या बहिणीची मुलगी किंवा स्वतःची मुलगी असल्याची बतावणी आरोपीने केली होती. याच दरम्यान आरोपी शंभू मल्ल याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या गुन्ह्यात आरोपी मल्ल याला 29 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. 3 मार्च 2024 पासून आरोपी मल्ल हा न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीच्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी शंभू मल्ल हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे, आरोपीने पीडित मुलीला तिच्या आईवडिलांच्या ताब्यातून पळवून आणले असून अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे समजताच आरोपीने मालवण मधून पळ काढला, आरोपीला पनवेल येथे पकडण्यात आले आहे,आरोपी हा नेपाळ देशातील असल्याने जामीन मिळाल्यास तो खटल्याच्या कामी हजर राहणार नाही आदी मुद्दे मांडले. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी शंभू मल्ल याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळून लावला.