वेंगुर्लेत होडी उलटून चौघे खलाशी बुडाले, तिघे सुखरूप

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ले बंदरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यावेळी लहान होडी बुडाली. या दुर्घटनेत चार खलाशी बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे तर तीन जण पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. बुडालेल्या खलाशांचा शोध रात्रीपासून आतापर्यंत सुरू आहे. वेंगुर्लेतील या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहेकाल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडात आणि विजांचा लखलखाट करत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याच दरम्यान वेंगुर्ले बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे जीवाची परवा न करता पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र चार खलाशी अद्याप पर्यंत सापडलेले नाहीत. ते पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्या चार खलाशांमध्ये एक खलाशी रत्नागिरी येथील तर तीन खलाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याचे समोर येत आहे. रात्री वादळी वाऱ्याबरोबरच वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्याच अंधाऱ्या रात्री मध्ये ही दुर्घटना घडली आहे. तात्काळ अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. मात्र रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही. आज सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू झाले आहे. मात्र अद्याप पर्यंत बुडालेली होडी आणि चारही खलाशांचा पत्ता लागलेला नाही. वेंगुर्ले पोलीस आणि स्थानिक मच्छीमार अजूनही शोध कार्य करत आहेत.

error: Content is protected !!