वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व सोनाळी येथे खरीप हंगामपुर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वैभववाडी तालुका कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

बिज प्रक्रिया, भात लागवड पद्धत, विविध योजनांची शेतकऱ्यांना देण्यात आली माहिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरुवार दि.०६-०६-२०२४ रोजी मौजे सोनाळी येथे खरीप हंगामपुर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषिपर्यवेक्षक ए.आर. पाटील यांनी भात बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी व जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करणे व भात लागवडीची श्री पद्धत याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकरी गटांना सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत भात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री.भोसले , प्रगतशिल शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक कृषी सहायक डी.डी.मसेकर यांनी केले. तर शुक्रवार दि.०७-०६-२०२४ रोजी मौजे नाधवडे येथे खरीप हंगामपुर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रगतशिल शेतकरी राजेश तावडे यांच्या प्रक्षेत्रावर उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषि अधिकारी युवराज पाटील यांनी भात बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी याबाबत तसेच कृषिपर्यवेक्षक ए.आर. पाटील यांनी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया, चटई रोपवाटिका तयार करणे याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकरी गटांना सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत निविष्ठा वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक कृषी सहायक भुजंग यांनी केले. मंडळ कृषि अधिकारी उत्तम मंदावाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!