सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ प्रभाग तळेरे – कासार्डे ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ संपन्न
तळेरे (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवून मार्गक्रम करा, शिका, संघर्ष करा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी विराजमान होण्याचे असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी कासार्डे येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ प्रभाग तळेरे कासार्डे पंचक्रोशी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.सोमनाथ कदम, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज व नेते मंडळ प्रभाग तळेरे कासार्डेचे अध्यक्ष व कासार्डे गावचे पोलीस पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र देवरुखकर, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश वाघेरकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष शंकर चव्हाण, तळेरे – कासार्डे प्रभागाचे सचिव – संतोष जाधव, जेष्ठ कार्यकर्ते दत्ताराम जाधव,पत्रकार दत्तात्रय मारकड व अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महाराष्ट्राचे युगप्रवर्तक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमचा प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग सचिव संतोष जाधव यांनी करताना तळेरे कासार्डे प्रभागाच्या कार्याचा आढावा घेऊन सातत्याने उपक्रम जिल्ह्या सर्वप्रथम विविध उपक्रम राबविणारा प्रभाग असल्याचे गौरवोद्गार करीत मान्यवरांचे स्वागत केले.
प्रभागाच्यावतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तळेरे – कासार्डे पंचक्रोशीतील विविध स्पर्धा परीक्षा, तसेच दहावी बारावी क्रीडापट्टू गुणवंत, यशवंत याशिवाय विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य, छत्री व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.