कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कौलव येथे सरपंच आणि ‘अनिस’ च्या सतर्कतेमुळे गुप्त धनासाठी नरबळीचा प्रकार होताहोता टळला. यावेळी राधानगरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. शरद माने, महेश माने, अशिष चव्हाण, चंद्रकांत धुमाळ, संतोष लोहार, कृष्णात पाटील अशी अटक झालेल्याची नावे आहेत.
सरपंच रामचंद्र कुंभार, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून आरोपी शरद माने यांच्या घरी काही मांत्रिक येत असल्याचा संशय होता. त्यानुसार सरपंच रामचंद्र कुंभार यांच्यासह सदस्यांनी शरद माने यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना घरात एका चटईवर हळद, कुंकू, सुपारी, नारळ, पानाचे, विडे,टाचण्या लावलेले लिंबू यावर पूजा करण्यात येत असल्याचं दिसून आलं. तसंच देवघरात गुप्त धनासाठी खड्डा खणलेला होता हे सर्व पाहून सरपंच यांच्यासह सहकार्यांना हा सर्व अघोरी आणि जादू टोण्याचा प्रकार सुरु असल्याचं लक्षात आलं. यानंतर सरपंचांनी या सर्व प्रकाराबाबत जाब विचारला असता तुम्ही निघून जा अन्यथा ठार मारीन अशी धमकी देण्यात आली. यानंतर सरपंचांनी हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्याने हा अघोरी प्रकार होताहोता टळला आहे.