काळसे बागवाडी येथे पुरस्थिती गंभीर ; मध्यरात्री अनेक घरांना पाण्याचा वेढा ; काही घरांमध्ये घुसले पाणी ; सुप्रसिद्ध शनीमारुती मंदिरही पाण्यात

अनेक शेतकऱ्यांचे पॉवरटीलर पाण्याखाली, वाहने आणि जनावरे हलविली सुरक्षित स्थळी.

भातशेतीचे मोठे नुकसान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज.

तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी पुरस्थीतीचा आढावा घेत स्थानिक रहिवाशांना केले स्थलांतराचे आवाहन.

स्थानिकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची केली मागणी.

चौके (अमोल गोसावी) :

गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्ली नदिच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ होऊन रात्रौ अडीच वाजता काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. आणि ऐन झोपेच्या वेळी बागवाडी ग्रामस्थांची मात्र तारांबळ उडाली. काही शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपली गुरे ढोरे , वाहने , ट्रॅकटर इत्यादी वाहने सावधगिरी बाळगून रात्रीच होबळीचा माळ सातेरी मंदिर येथे सुरक्षित स्थळी हलवली. पण काही शेतकऱ्यांची गुरे अजूनही पुराच्या वेढ्यामध्ये अडकली आहेत. आज सकाळ पासून पाणी पातळीमध्ये अजूनच मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सकाळच्या वेळी पुरस्थीती गंभीर झाली होती.
अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काळसे धामापूर मधील शेती क्षेत्रात नांगरणीसाठी वापरण्यात येणारे काही शेतकऱ्यांचे पॉवर टीलर पुराच्या पाण्याखाली अडकल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. तसेच लावणी साठी काढून ठेवलेला तरवा ही मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. संध्याकाळपर्यंत पुरस्थिती आटोक्यात न आल्यास बागवाडीतील बहुतांश घरांमध्ये पुराचे पाणी घुसून फार मोठी पुरहानी होऊ शकते अशी भिती स्थानिकांनी व्यक्त केली.

दरम्यान आज पहाटेपासूनच प्रशासन यंत्रणा मात्र बागवाडी ग्रामस्थांच्या मदतीसाठी सज्ज झाली असून ग्रामपंचायत , महसूल प्रशासन आणि आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती विभाग काळसे गावात ठाण मांडून आहेत व पुरस्थीतीवर लक्ष ठेवून बागवाडी ग्रामस्थांना आवश्यक मदत पोचवण्यासाठी सातेरी मंदिर परीसरात उपस्थित आहेत. मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी आज सकाळी काळसे येथे भेट देउन बागवाडी येथील पुरस्थीतीचा आढावा घेतला आणि स्थानिकांशी चर्चा केली व त्यांना धोका न पत्करता सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी स्थलांतर केल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था नजीकच्या शाळेमध्ये केली असून त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्थाही प्रशासना कडून करण्यात येईल असे सांगितले. व पुरस्थीती अधिक गंभीर झाल्यास आवश्यक बोटी , लाईफ जॅकेट आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. मंडळ अधिकारी डी. व्ही शिंग्रे , हेड कॉन्स्टेबल टी. जी. मोरे. पोलिस पाटील विनायक प्रभु , यांनी स्थानिक रहिवाशी महेश कोरगांवकर यांच्या होडीतून बागवाडीमध्ये जाऊन पुरस्थीतीची पाहणी केली आणि रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विहीरींमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे सर्व नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. आणि पुराचा धोका वाढल्यास आपण लगेच स्थलांतर करु असे आश्वासन तहसीलदार वर्षा झाल्टे यांना दिले. यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंग्रे, तलाठी निलम सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, ग्रामसेवक पी. आर. निकम, सरपंच विशाखा काळसेकर, चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक एस. एस. चव्हाण, आरोग्य सहाय्यीका वाय. एस. सावंत, गौरी कसालकर, समुदाय आरोग्य अधिकारी डी. डी. शेवडे, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल टी. जी. मोरे, सिध्देश चिपकर, पोलीस पाटील विनायक प्रभु , कोतवाल प्रसाद चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण भाटकर, सावंत, यांच्या सह निवृत्त पोलीस कर्मचारी वालावलकर, यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!