अधिसूचित क्षेत्र व लगतच्या गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी अधिसूचित क्षेत्र व लगतच्या गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे समावेश करून सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीचा फेर प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे आदेश पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यालय पत्रकार संघाने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्र्यांना या मागणीचे पत्र दिले होते.

सिंधुदुर्गनगरी नवानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रामुख्याने नगरपंचायतीची आवश्यकता आहे. तर सिंधुदुर्गनगरी लगतच असलेल्या ओरोस, रानबांबुळी व अणाव या ग्रामपंचायत क्षेत्राचा विकसित झालेला काही भाग समाविष्ट करून नगरपंचायत होण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. ओरोस, रानबांबूळी व अणाव या तिन्ही गावांनी या मुख्यालय विकासासाठी अर्थात सिंधुदुर्गनगरी विकासासाठी अत्यंत अल्प मोबदल्यात जागा देऊन या शहर विकासासाठी सहकार्य केले आहे. त्यापूर्वी रानबांबुळी व ओरोस येथे दोन तलाव असून त्यासाठी ही या तीनही गावातील जमीन संपादित झाली होती. कोकण रेल्वे मध्ये दोन गावातील जमीन संपादित झाली होती. त्यामुळे नगरपंचायत निर्मितीवेळी काही आरक्षणे पडून येथील शेतकरी व नागरिकांचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार आंदोलनावेळी व्यक्त केली होती. याच आंदोलनाची दखल घेऊन तसे पत्र त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सादर केले होते.

काही वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला होता. मात्र या प्रस्तावाची मुदत संपल्यामुळे आता फेर प्रस्ताव सादर करण्याचे आवश्यकता असल्याचे मत नगर विकास विभागाने व्यक्त केले होते. त्यानुसार हा फेर प्रस्ताव पाठवावा व येथील नागरिकांच्या हरकती व सूचना विचारात घेऊन सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी विनंती सिंधुदुर्गनगरी नगरवासीयांची होती. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघाने काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी भवना समोर आंदोलन केले होते. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात निवासी वाणिज्य संस्था सहकारी संस्था बस स्थानक व्यापारी संकुल आदी विकास तसेच या परिसरातील रहिवाशांचे प्रश्न त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता आदि अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या नवनगर विकास प्राधिकरण समितीला तसेच लगतच्या ग्रामपंचायतींना विकासाबाबत अनेक मर्यादा आहेत. म्हणूनच यावर पर्याय म्हणून येथील नगरपंचायतीची निर्मिती लवकरात लवकर करणे आवश्यक होते. जोपर्यंत फेर प्रस्ताव सादर होत नाही तोपर्यंत शासन यावर विचार करणार नाही याची जाणीव असल्यामुळे मुख्यालय पत्रकार संघाने याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालय पत्रकार संघाने भेट घेत चर्चा केली होती. चर्चेला प्रभाकर सावंत यांनी चांगला प्रतिसाद देत शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले. पालकमंत्र्यांनी ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. या नव्या नगरपंचायतीचा फेर प्रस्ताव शासनाकडे सादर करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या नगरपंचायतीच्या निर्मितीची वाटचाल आता प्रशासनाकडून सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!