महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन ; हल्लेखोराला २४ तासात अटक करा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोराना २४ तासात अटक करा. या मागणीसाठी आज महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये महसूल विभागामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशावेळी अतिरिक्त कार्यभार आणि त्यामुळे ताणतणाव यामुळे कर्मचारी अगोदरच दबावाखाली वावरत असताना कर्मचाऱ्यांवर प्राणघातक गंभीर दुखापत करण्याच्या हेतूने २३ जुलै रोजी हल्ला झालेला आहे.या घटनेचा आज महसुल संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. संबंधित हल्लेखोराला २४ तासात अटकेची कारवाई व्हावी. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले होते .मात्र त्याची अद्याप दखल घेतली नसल्याने महसुल कर्मचाऱ्यांनी आज एक दिवशीय रजा आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन छेडले. तसेच संबंधिताला अटक होऊन कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही तर ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने जाहिर पाठिंबा दिला असून मारहाण सारखी घटना आणि कर्मचाऱ्यावरील अन्याय कदापी सहन करणार नाही. असे म्हटले आहे.

जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान माळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महसूल सहाय्यक, तलाठी मंडळ अधिकारी , अव्वल कारकून, कोतवाल शिपाई यांच्यासह महसुल संघटनेचे पदाधिकारी संभाजी खाडे शिवराज चव्हाण, विलास चव्हाण, संतोष खरात एम.जी.गवस, एकनाथ गंगावणे ,स्वप्निल प्रभू अशोक पोळ, रमेश कांबळे,दिलीप पाटील,राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगावकर, एस एल सपकाळ, यांच्यासह विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी

सावंतवाडी महसूल कार्यालयामधील कर्मचाऱ्याला झालेली मारहाण निषेधार्थ असून अशा घटनेमुळे कर्मचारी सुरक्षित नाही हे दिसून येते. अशा घटना होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित हल्लेखोराला तात्काळ अटक करावी. अन्यथा महसूल कर्मचाऱ्यांसोबतच राज्य सरकारी कर्मचारीही आंदोलनाचा पवित्रा घेतील. – राजन कोरगावकर, अध्यक्ष ,राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती,

आंदोलन अधिक तीव्र करू

महसुल सहाय्यकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन आठ दिवस झाले तरीही हल्लेखोर इसमावर अद्याप कारवाई झालेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करून ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल – सत्यवान माळवे अध्यक्ष, महसुल कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!