सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच भाजपा खासदार अनुराग ठाकुर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर जोडे मारून जोडेमारो आंदोलन करण्यात आले व भाजपा सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडीया आघाडीतील मित्र पक्ष जातीनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत परंतू भारतीय जनता पक्षाचा जातीनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी खा. राहूल गांधी यांना जात विचारून त्यांचा अपमान केला आहे.
जात धर्माच्या आधारावर राजकारण करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. आज २१ व्या शतकातही ही मनुवादीवृत्ती डोके वर काढत आहे, तेच लोकसभेत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी दाखवले आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अनुराग ठाकूरच्या विधानाचे कौतुक केले आहे हे त्याहून गंभीर आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करते हे या देशाचे दुर्दैव आहे. संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथविधी घेणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत हे पुन्हा एकदा त्यांनीच त्यांच्या कृतीतून दाखवून दिले असल्याचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान खा. राहूल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान करणाऱ्या अनुराग ठाकूर व त्यांच्या विधानाचे समर्थन करणारे नरेंद्र मोदी यांचा सिंधुदुर्ग काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे. हा आमचा निषेध नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचविणारे निवेदन काँगेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी साईनाथ चव्हाण, विलास गावडे, प्रकाश जैतापकर, विजय प्रभू,महेश अंधारी,अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, मेघनाद धुरी,महेंद्र सांगेलकर आदी उपस्थित होते