सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेत केवळ वेंगुर्ला शाखेत भ्रष्टाचार झालेला नाही. तर जिल्ह्यातील सर्व शाखांत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्व शाखांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी. तसेच संचालक मंडळाने तात्काळ विशेष सर्वसाधारण सभा लावावी. तशी मागणी करणारे ३०० सभासदांची स्वाक्षरी असलेले निवेदन पतसंस्था अध्यक्षांना देण्यात आले आहे. त्यामुळे सभा न घेतल्यास पतसंस्था सभासद १० ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करणार आहेत, असा इशारा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेत झालेल्या अपहराची माहिती देण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, म ल देसाई, के टी चव्हाण, शंकर गोसावी, दिनकर केळकर, वंदना सावंत, संजय शेळके, तेजस्वी बांदेकर, जाकिर शेख, तेजस बांदिवडेकर, संतोष गवस, बाबाजी झेंडे, भास्कर गावडे आदी उपस्थित होते.