सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५० हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख ३५ हजार ५२७ अर्ज मंजूर करून अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. प्राप्त १०० टक्के अर्जांची छाननी करून अनुदानासाठी राज्य शासनाकडे पाठविणारा सिंधुदुर्ग जिल्हा पहिला जिल्हा ठरला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा निधी या महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात महिलांना मदत होणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात आली. यानंतर जिल्हाध्यक्ष सावंत यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सावंत यांनी साधी, सरळ आणि सुटसुटीत अशी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना आणली आहे. राज्यातील भगिनींचा आर्थिक स्तर उंचावला जावा यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. तसेच ही योजना जिल्ह्यात यशस्वी व्हावी यासाठी भाजपने विशेष प्रयत्न केले. तिन्ही विधानसभेसाठी स्वतंत्र तीन सदस्य समिती नियुक्त केली होती. जिल्ह्यात भाजपचे ८० टक्के सरपंच आहेत. त्यांच्याकडून दररोज माहिती घेतली जात होती, असे सांगितले.
जिल्ह्यामध्ये १ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत योजनेसाठी एक लाख ५० हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख ३५ हजार ५२७ अर्ज आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. केवळ ६० अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. यामध्ये ६५ वर्षांवरील, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्याने हे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर १४ हजार ९७३ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये सुधारणा करून पुन्हा अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यांना तशी सूचना जाणार आहे. लाभार्थ्यांनी त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा भरावा, असेही आवाहन यावेळी प्रभाकर सावंत यांनी केले आहे.