राजकोट किल्ल्यावर नवीन शिवपुतळा निर्मितीसाठी चे टेंडर आधीच मॅनेज ?

पुतळा उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी ; पुन्हा पुतळा दुर्घटनेची भिती

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासन ज्याप्रमाणे बदलापूरच्या अक्षय शिंदेचे प्रकरण दाबतेय त्याचप्रमाणे राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटना प्रकार दाबत आहे. शिवपुतळा दुर्घटनेबाबत राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समिती चा अहवाल जाहीर न करता आज शासनाने पुन्हा राजकोट किल्ल्यावर नव्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्यासाठी 20 कोटींची निविदा काढली आहे. ही निविदा भरण्यासाठी केवळ 8 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अवघ्या 4 दिवसांत टेंडर मिळालेल्या एजन्सी ने 4 दिवसांत पुतळ्याची फायबर मधील प्रतिकृती बनवून कला संचालनालय ची परवानगी घेण्याची अट घालण्यात आली आहे. हा नवीन पुतळा उभारणीसाठी केवळ 6 महिन्यांचा कालावधी निविदेमध्ये दिला आहे. जयदीप आपटे याला शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यांचा कालावधी दिला गेला होता. मात्र तरीही निकृष्ट काम झाल्यामुळे शिवपुतळा कोसळला.तर 6 महिन्यांत नवीन दर्जेदार पुतळा कसा तयार होणार ? दर्जेदार टिकाऊ पुतळा बनविण्यासाठी किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो. धुळे येथील राम सुतार नामक शिल्पकाराला शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बनविण्याचे काम देण्याची हालचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामधून शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्याचे काम कोणाला द्यायचे हे आधीच फिक्स झाले असल्याचा संशय येत असल्याचे उपरकर म्हणाले. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा याआधीचा कोसळलेला पुतळा बसविताना आणि आता नवीन पुतळा बसविण्याआधीही सीआरझेड ची परवानगी घेतली नसल्याचा आरोप उपरकर यांनी केला. जर यासाठी सीआरझेड ची परवानगी घेत नसाल तर मालवणमधील हॉटेल व्यावसायिक आणि घरानाही सीआरझेड परवानगीची अट रद्द करावी अशी मागणीही उपरकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!