मयत व्यक्तीच्या नावे खोटे, बनावट खरेदीखत तयार करून जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा संशयितां विरुद्ध देवगड पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : मयत व्यक्तीच्या नावे खोटे, बनावट खरेदीखत तयार करून व कुळांचे हक्क डावलून त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ जानेवारी २०१० ते १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत घडली आहे. देवगड न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खासगी फिर्यादीनंतर संशयितांवर देवगड पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा तपास तीन महिन्यांत पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देवगड न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

मिठमुंबरी येथील सर्व्हे नं. ५६, हि. नं. १ ही मिळकत सत्यविजय आत्माराम राणे यांच्या मालकीची असून त्यांचे ७ मे २००६ रोजी निधन झाले आहे. असे असताना मंगेश आत्माराम गावकर (५५, रा. मिठमुंबरी), नरेंद्र हरी गावकर (५३, रा. मिठमुंबरी), संजय सिताराम जाधव (५२, रा. इळये), प्रमोद परशुराम गावकर (५० रा. मिठमुंबरी), मोहन सिताराम जाधव (५५, रा. इळये), बाळकृष्ण आत्माराम गावकर (५८, रा. मिठमुंबरी) या संशयितांनी संगनमताने सर्व्हे नं. ५६, हि. नं. १ या मिळकतीचे २९ नोव्हेंबर २०१० रोजी खोटे, बोगस, बनावट खरेदीखत तयार केले. या मिळकतीच्या सातबारा सदरी मुख्य संशयित मंगेश गावकर याने आपले नाव लावून घेतले. हे खरेदीखत करताना त्यांनी पुराव्याची खोटी कागदपत्रे जोडली आहेत. तसेच मयत सत्यविजय राणे यांच्या नावे कुणीतरी तोतया व बोगस इसम उभा करून खरेदी दस्तावर त्यांच्याकरवी सत्यविजय राणे यांच्या खोट्या सह्या, अंगठ्याचे ठसे व फोटो घेतले गेले आहेत. तसेच मुख्य संशयित मंगेश गावकर याने तहसीलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरणात एक खोटी, बनावट व बोगस तडजोड पुरशीस दाखल करून त्याआधारे आपण मिळकतीचे मालक कब्जेदार झालो असल्याचा खोटा पुरावा तयार करून तो न्यायालयात सादर केला आहे. संशयितांची कृत्ये गुन्हेगारी स्वरुपाची असून फौजदारी कायद्यांतर्गत संशयितांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी कुळवहिवाटदार दिलीप कृष्णा नेसवणकर (६२, रा. मिठमुंबरी) यांनी देवगड दिवाणी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवर सुनावणी करताना न्यायालयाकडे दाखल पुरावे ग्राह्य मानून या प्रकरणाचा तपास तीन महिन्यांत पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर सादर करावा, असे आदेश न्यायालयाने देवगड पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार देवगड पोलिसांनी मुख्य संशयित मंगेश गावकर, नरेंद्र गावकर, संजय जाधव, प्रमोद गावकर, मोहन जाधव, बाळकृष्ण गावकर या संशयितांविरुद्ध भा. दं. वि. संहिता कलम १९३ (१), १९६, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७०, ४७१, ४७५ सह कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव करीत आहेत. तर फिर्यादीच्यावतीने अॅड. महेश काळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!