रोहन खेडेकर नगरसेवक अपात्रतेवर विभागीय आयुक्तांकडून शिक्कामोर्तब

देवगड नगरपंचायत सीईओना खेडेकरच्या अपात्रता अंमलबजावणी करण्याचे नगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्तांचे आदेश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा निर्णय सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. 30 सप्टेंबर रोजी कोकण विभागीय आयुक्तांनी हा निकाल कायम ठेवत खेडेकर यांच्या नगरसेवक पदावरून अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच नगरपरिषद प्रशासन च्या सहआयुक्तांनी देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना रोहन खेडेकर यांच्या नगरसेवक पदावरून अपात्रतेच्या कोकण आयुक्तांच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

रोहन खेडेकर यांनी नगरसेवक असताना बेकायदेशीर बांधकाम केले याबाबत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पुरावे पडताळून तक्रार ग्राह्य धरून रोहन खेडेकर यांना नगरसेवक पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता . या निर्णयाविरुद्ध रोहन खेडेकर यांनी कोकण आयुक्तांकडे अपिल अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोकण आयुक्तांनी फेटाळून लावला असून निरीक्षण नोंदवताना त्यांनी नमूद केले आहे की, अधिनियम, १९६५ मधील तरतूदींचा भंग करुन बेकायदेशीरपणे इमारत बांधकाम केल्याचा निष्कर्ष होकारार्थी काढला आहे. त्याबाबत रोहन खेडेकर यांनी ठोसरित्या खंडन केलेले नाही. जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग यांच्या आदेशात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ४४ (१) (इ) मधील तरतूदींचा भंग करुन अनधिकृत बांधकाम करण्यास परिषद सदस्य प्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचे व सदरील बांधकाम त्यांच्या नगरसेवक पदाच्या कालावधीत झाल्याचे सिध्द होत आहे, त्याबाबतही खंडन केलेले नाही.

रोहन खेडेकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दिनांक २१ मार्च २०२३ रोजी केलेल्या अर्जातील टंकलेखनातील चूक नमूद करून कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तताबाबतच्या पत्राच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ च्या ऐवजी दिनांक २६ ऑगस्ट २०२२ अशी दुरुस्ती करावी असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार रोहन खेडेकर यांनी कार्यालयीन ऑनलाइन सिस्टिम मधील ट्रॅक रीपोर्ट दाखवून परवानगी मिळाल्याचा दावा केला आहे. परंतु रोहन खेडेकर यांनी बांधकाम परवानगी मिळाल्या बाबत कोणताही आदेश सादर केलेला नाही. तथापि उपलब्ध पंचनामे. स्थळ पाहणी अहवाल, जीपीएस मॅप व छायाचित्रे इ. नुसार अपिलंट यांनी परवानगी मिळण्यायापूर्वीच बांधकाम केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे रोहन खेडेकर यांनी विना परवानगी बांधकाम केल्याचे सिद्ध होते. वरील निरिक्षणे लक्षात घेता जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी पारित केलेल्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे निष्कर्ष विकास पानसरे, विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी काढून पुढील आदेश दिले आहेत.

रोहन खेडेकर यांचे अपिल नामंजूर करण्यात येत असून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत नगरसेवक अपात्रता प्रकरणी दिलेला देश कायम करत असून रोहन खेडेकर यांना नगरसेवक म्हणून बडतर्फ करण्यापासून कोणतेही अभय मिळणार नाही. असे म्हटले आहे यामुळे आता रोहन खेडेकर यांना नगरसेवक पदावरून बडतर्फ केले आहे. तक्रारदार योगेश चांदोसकर यांच्या वतीने अँड सुधीर प्रभू यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!